
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
१ सप्टेंबर २०२६ पासून, भारतातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. त्यामुळे प्रवासही सुखकर होणार आहे. इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर स्टॅंप मारला जायचा त्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत त्याची आता आवश्यकता राहणार नाही. या व्यतिरिक्त प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवरील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास दाखवू शकतील. प्रिंटेड बोर्डिंग पासचाही यामध्ये वापर करता येईल. यामुळे विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्डिपार्चर प्रक्रिया सहज आणि सुलभ होईल.
मुंबईतील डेअरी फार्ममधून सप्लाय होणारं ताजे म्हशीचे दूध १ सप्टेंबरपासून महाग होणार आहे. मुंबई दूध उत्पादक संघटनेने या दरामध्ये वाढीची घोषणा केली आहे. त्यानुसार दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ केली आहे. घाऊक दर प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये होईल. हा नवीन दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहणार असल्याचं उत्पादक संघटनांनी स्पष्ट केलं आहे. ही वाढ घाऊक दरात आहे. दुधाचा दर थेट प्रत्येक ग्राहकासाठी प्रति लिटर ९ रुपयांनी वाढेलच असे नाही. स्थानिक पुरवठादार आणि दुकानदारानुसार किरकोळ दरात फरक असू शकतो.
इनकम टॅक्स रिटर्न ITR दाखल करण्याच्या अंतिम मुदतीमध्येही बदल करण्यात आला आहे. बिजनेस किंवा प्रोफेशनमधून उत्पन्न मिळवणाऱ्या आणि ज्यांच्या हिशेबांचे ऑडिट होत नाही, अशा करदात्यांसाठी निर्धारण वर्ष २०२६-२७ करिता आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ म्हणजे आज आहे. ही अंतिम मुदत प्रामुख्याने पात्र करदात्यांद्वारे ITR-३ आणि ITR-४ दाखल करण्याशी संबंधित आहे. जर एखादा करदाता अंतिम मुदतीपर्यंत आपले विवरणपत्र दाखल करू शकला नाही, तर लागू नियमांनुसार नंतर विलंबित आयटीआर दाखल करता येईल. पण त्यांच्यावर विलंब शुल्क आणि नियम लागू होऊ शकतात.
ज्या LPG ग्राहकांना e-KYC पूर्ण केलेली नसेल त्यांच्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. यासाठीची मुदत या महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आवश्यक पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी. वेळेत पडताळणी न केल्यास, १ सप्टेंबरपासून गॅस कनेक्शन किंवा त्याशी संबंधित लाभांबाबत समस्या उभ्या राहू शकतात. त्यामुळे नुकसान होऊ नयेत त्यासाठी ही प्रक्रिया लगेच करुन घ्या.
तेल कंपन्या वेळोवेळी LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि महिन्याच्या सुरुवातीला नवीन दर जाहीर करतात. त्यामुळे १ सप्टेंबरपासून किमतींमध्ये बदल दिसून येऊ शकतात.