100 गीर गायींचा गोठा उभारला; इंजिनीअर तरुण पत्नीसह करतोय वर्षाला कोट्यवधींची उलाढाल!
राज्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून डेअरी व्यवसाय करतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यातील मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. याशिवाय शेतीसाठी सेंद्रिय खताचा स्वरूपात शेणखताची देखील पूर्तता होते. परिणामी, दुग्धव्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत झाली आहे. आज आपण अशाच एका दुग्ध उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जो १०० गीर गायींच्या पालनातून कोट्यवधींची कमाई करत आहे.
शिक्षणानंतर दुग्ध व्यवसायाची धरली वाट
विभोर जैन असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो राजस्थानमधील जयपूर येथील रहिवाशी आहे. त्यांनी आपला गीर गायींचा फार्म ‘डेअरी फार्म तिबरिया, हिंगोनिया रोड, जयपूर या ठिकाणी उभारला आहे. विभोर याने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१७ मध्ये नोकरी करण्याऐवजी दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो दूध व्यवसायात यश मिळवत, आज १०० गीर गायींचा गोठा चालवत आहे. विशेष म्हणजे त्याला डेअरी व्यवसायात पत्नी इशिता जैन हिची देखील खूप मदत होते.
स्वतःची जमीन नसतानाही केली हिंमत
याशिवाय विभोर जैन यांनी दुग्ध व्यवसायात एक नवीन ओळख निर्माण करत आपला ‘किनाया ऑरगॅनिक फार्म्स अँड लाइफ ब्रँड’ नावाने ब्रँड देखील सुरु केला आहे. ज्यामध्ये तो दुधावर प्रक्रिया करून दूध, ताक, तूप आणि पौर्णिमा शतधौत तूप, मलई अशी विविध उत्पादने तयार करतो. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे स्वतःची कोणतीही जमीन नसल्याने भाड्याने जमीन घेत हा व्यवसाय सुरु केला. मात्र, आता अलीकडेच त्याने दूध व्यवसायाच्या जोरावर 12 एकर शेती घेतली आहे. दुग्ध व्यवसायाच्या सुरुवात करताना, २०१७ मध्ये विभोर यांनी 20 गीर जातीच्या गायी खरेदी केल्या होत्या. ज्यावेळी एका गायीची सरासरी किंमत 1.25 लाख रुपये होती. विकत घेतलेल्या गायींमध्ये काही गाभण तर काही दुभत्या होत्या.
किती मिळतोय दुधाला दर?
विभोर जैन सांगतात, “चांगल्या दरात दुधाची विक्री करण्यासाठी प्रथम ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. यासाठी आपण फेसबुक आणि यूट्यूबची सारख्या समाजमाध्यमांची मदत घेतली. सुरुवातीला गिर गाईचे दूध 91 रुपये प्रति लिटर दराने विकायचो. सध्या ते 125 रुपये प्रति लिटर दराने विकतो. तर आपल्या डेअरी फार्ममध्ये दररोज 300 ते 350 लिटर दुधाचे उत्पादन करते. सरासरी 100 ते 125 लिटर दुधाची विक्री करून, उरलेल्या दुधापासून तूप तयार करतो. तूप 3300 रुपये प्रति लिटरने विकले जाते. जे आपण अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये निर्यात होते. ताक जयपूर येथे स्थानिक पातळीवर विक्री केले जाते.”
किती होतीये वार्षिक उलाढाल?
युवा उद्योजक विभोर जैन सांगतात, दुग्ध व्यवसायात सर्वच गोष्टींना किंमत असते. त्यात गीर गाय पालन करत असल्याने, तिच्या दुधापासून ते शेणापर्यंत सर्वांनाच चांगली किंमत मिळते. त्यामुळे सध्या आपण दूध, ताक, तूप आणि पौर्णिमा शतधौत तूप, मलई इत्यादीं माध्यमातून वार्षिक 1.25 कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ज्यामध्ये खर्च वजा आपल्याला वार्षिक ४५ ते ५० लाखांचा नफा शिल्लक राहत असल्याचे ते सांगतात.