
दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) आता आणखी सुपरफास्ट होणार आहे. कारण आता भारतीय रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी घोषणा केली आहे की, भारतीय रेल्वेमध्ये 75000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सीतारमण यांनी आज संसदेमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा (Union Budget 2023) अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत.
नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी
भारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.
कार्गो टर्मिनल
अर्थसंकल्पामध्ये बंदरांकडे आणि दळणवळणाच्या इतर सोयींकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यात 50 अतिरिक्त एअरपोर्ट, हेलिपॅड, वॉटर एअरोड्रोमचं नुतनीकरण होणार आहे जेणेकरून क्षेत्रीय कनेक्टिविटी वाढेल. या अर्थसंकल्पामध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याकडेही लक्ष देण्यात आलं आहे. या ट्रेन ताशी 180 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतील. अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे बोर्डाने अर्थ मंत्रालयाच्या बजेट एलोकेशनमध्ये 25-30 टक्के जास्त फंड देण्याची मागणी केली होती. आर्थिक वर्ष 2022-23 चे सर्वसामान्य आणि रेल्वे बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅनची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं होतं की, रेल्वे 100 गति शक्ती कार्गो टर्मिनल बनवणार आहे. आगामी तीन वर्षांमध्ये या टर्मिनलची निर्मिती होणार आहे. अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे, छोटे शेतकरी तसेच लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी आणि उप्तादनाच्या दळणवळणासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची घोषणा केली होती.