शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, शेअर बाजारात आणतोय मोठा आयपीओ; गुंतवणूकदारांना करणार मालामाल!
आजकाल शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुले विविध व्यवसायांमध्ये आपला ठसा उमटवताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. शेतीची पार्श्वभुमी असलेले हे तरुण काम करताना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने काम करतात. त्यामुळे त्यांना त्यातून यश नक्कीच मिळते. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या मुलाबाबत जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारात पदार्पण केले आहे. केआरएन हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन प्रायवेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून, तिचा आयपीओ 25 सप्टेंबर रोजी बाजारात खुला होणार आहे.
2017 मध्ये कंपनीची सुरुवात
संतोष कुमार यादव असे या व्यक्तीचे नाव असून, ते 44 वर्षांचे आहेत. राजस्थानमधील तिजारा या छोट्या शहरातील ते रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. पण आपल्या प्रयत्नातून या शेतकऱ्याच्या मुलाने लॉयड इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रशिक्षणार्थी ऑपरेटर होण्यापासून ते केआरएन हीट एक्सचेंजर्स अँड रेफ्रिजरेशन कंपनी लिमिटेडचा संस्थापक होण्यापर्यंतचा पल्ला गाठला आहे. संतोष कुमार यादव यांनी 2013 मध्ये, लॉयड इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंगमधील नोकरी सोडल्यानंतर, त्यांनी एका गुंतवणूकदारासह भिवंडीमध्ये मायक्रो कॉइल्स आणि रेफ्रिजरेशनची स्थापना केली. 2017 मध्ये, त्याने कंपनीतील आपला हिस्सा विकला आणि केआरएन हीट एक्सचेंजर्स आणि रेफ्रिजरेशन कंपनी सुरू केली.
हे देखील वाचा – जपानमधून येणार भारताची पहिली बुलेट ट्रेन; करावी लागेल थोडी प्रतीक्षा
कंपनी 17 राज्यांमध्ये पुरवते उत्पादने
केआरएन हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन प्रायवेट लिमिटेड या कंपनी ही हीटिंग, वेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या ॲल्युमिनियम आणि कॉपर फिन ट्यूब कंडेन्सर आणि कॉइल तयार करते. 2017 मध्ये ही कंपनी स्थापन झाल्यानंतर, कंपनीने 2018 मध्ये आपले उत्पादन सुरू केले. सध्याच्या घडीला ही कंपनी भारतातील किमान 17 राज्यांमध्ये आपली उत्पादन पुरवत आहे. याशिवाय कंपनीची उत्पादने अमेरिका, कॅनडा, इटली आणि जर्मनीसह 9 देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. विशेष म्हणजे व्यवसायाच्या वाढीसह कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये कंपनीच्या महसुलाचा आकडा हा 308.28 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
25 सप्टेंबर रोजी खुला होणार आयपीओ
केआरएन हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन प्रायवेट लिमिटेड या कंपनीचा आयपीओ हा 25 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 27 सप्टेंबरपर्यंत या आयपीओसाठी बोली लावू शकणार आहे. या आयपीओचे मुल्य हे 341.95 कोटी रुपये असणार आहे. या आयपीओअंतर्गत संतोष कुमार यादव यांची ही कंपनी एकूण 15,543,000 शेअर जारी करणार आहे. हे सर्व नवीन शेअर्स असणार आहेत. या सर्व शेअरची दर्शनी किंमत ही 10 रुपये असणार आहे. या आयपीओसाठी कंपनीने 209 ते 220 रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. याशिवाय, या आयपीओची लॉट साइज 65 शेअर्स असणार आहे. अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 65 शेअर्ससाठी बोली लावावी लागणार आहे.
शेअर्स करतायेत 110 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग
संतोष कुमार यादव यांच्या या कंपनीचे शेअर्स आयपीओ उघडण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये जोरदार कामगिरी करत आहे. आयपीओ प्रीमियमनुसार, 23 सप्टेंबर रोजी अनलिस्टेड मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 110 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते. या पद्धतीने पाहिल्यास गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होण्याचे संकेत मिळत आहे. 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालवाधीत हा आयपीओ खुला असणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी या आयपीओच्या शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. डीमॅट खात्यात शेअर क्रेडिट प्रक्रिया 1 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. शेअर बाजारात कंपनीच्या लिस्टची संभाव्य तारीख ३ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)