
आंध्र प्रदेशात अदानी समूहाची मेगा गुंतवणूक! डेटा सेंटर, ग्रीन एनर्जीला मिळणार चालना
Adani Group projects in AP: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आंध्र प्रदेशातील डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक्स विद्यापीठात गुंतवणूक वाढवण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी भेट घेतल्यानंतर विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अदानी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी भेट घेतल्यानंतर राज्यात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली.
अदानी समूह आंध्र प्रदेशातील डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक्स विद्यापीठ यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करेल. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि अदानी पोर्ट्सचे एमडी करण अदानी यांनी काल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आणि भविष्यात नवीन गुंतवणूक संधींचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर, गौतम अदानी यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज्याच्या योजनांबद्दल माहिती शेअर केली. तेव्हा, एन. चंद्राबाबू नायडू यांच्या दूरदृष्टीची विशालता त्यांना नेहमीच प्रभावित करत असल्याचे सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की, मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र लोकेश नारा यांच्यासह, गुगलसोबत डेटा सेंटर सहकार्य वेगाने पुढे नेत आहेत. या भेटीनंतर एन. चंद्राबाबू नायडूंच्या व्हिजनने अदानी प्रभावित झाले आहेत.
गौतम अदानी यांनी स्पष्ट केले की, अदानी समूह आंध्र प्रदेशातील गुंतवणूक वचनबद्धतेला एका नवीन स्तरावर घेऊन जाईल. त्यांचे मुख्य लक्ष काही प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित असेल. यामध्ये डेटा सेंटर्स, ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक्स युनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे. अदानी समूह गुगल सोबत सहकार्याने डेटा सेंटर प्रकल्पांवर काम वेगवान करेल.
तसेच, राज्यातील ग्रीन एनर्जी क्षेत्रात गुंतवणूक वाढवेल. असे गौतम अदानी यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर, जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स युनिव्हर्सिटीचे बांधकाम देखील प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये अमरावती शहराच्या विकासातही आपला सहभाग सुनिश्चित करण्याचे वचन अदानी समूहाने दिले आहे.
अदानी ग्रुपने आंध्र प्रदेशातील विविध क्षेत्रांमध्ये आधीच गुंतवणूक केली आहे. या नवीन भागीदारीमुळे राज्यातील बंदरे, औद्योगिक कॉरिडॉर, ऊर्जा आणि शहरी पायाभूत सुविधा यासारख्या प्रकल्पांना गती मिळेल. गौतम अदानी यांच्या या उपक्रमामुळे आंध्र प्रदेशात नवीन गुंतवणूक तर आकर्षित होईलच, शिवाय स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होईल आणि रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील. भविष्यातील हे प्रकल्प राज्यातील तांत्रिक पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास वाढवतील.