शेतकऱ्यासाठी निर्णय (फोटो सौजन्य - Canva)
लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना गृहित धरून निवडणुकीची रणनीती ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी रणनीती बनवली होती. मात्र, त्याचा निवडणुकीत सरकारला मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील सरकार शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेताना दिसून येत आहे. अशातच आता केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी ७ मोठे निर्णय घेतले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हे देखील वाचा – विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!
या सात योजनांना केंद्र सरकारची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी 7 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशन, अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान, कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे,शाश्वत पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादन, फळशेतीचा शाश्वत विकास, कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन, नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन अशा सात योजनांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
कोणत्या योजनांना मिळालीये मंजुरी
– डिजिटल कृषी मिशन – 2817 कोटी रुपये खर्च केले जाणार.
– अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान – 3979 कोटी रुपये खर्च केले जाणार.
– कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे – 2291 कोटी रुपये खर्च केले जाणार.
– पशुधनाचे शाश्वत आरोग्य आणि उत्पादन योजना – 1702 कोटी रुपये खर्च केले जाणार.
– फळशेतीचा शाश्वत विकास योजना – 860 कोटी रुपये खर्च केले जाणार.
– कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन – 1202 कोटी रुपये खर्च केले जाणार.
– नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन – 1115 कोटी रुपये खर्च केले जाणार.
काय होणार शेतकऱ्यांना फायदा
दरम्यान, डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना सर्व ऑनलाईन सुविधा मिळणार आहे. अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 2047 पर्यंत वातावरणीय बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जाणार आहे. कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे ही योजना आणली आहे. तर पशुधनाचे शाश्वत आरोग्य आणि उत्पादन योजना, फळशेतीचा शाश्वत विकास योजना, कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन या योजनांद्वारे देखील शेतकऱ्यांचा विकास केला जाणार आहे.