
Digital Payments in Post Offices: पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल व्यवहारांची भरारी; पुणे विभागात ३.८८ कोटींचा महसूल जमा
Digital Payments in Post Offices: डाक विभागाच्या विविध सेवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल पेमेंट सुविधांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. डायनॅमिक क्यूआर कोडद्वारे फोन पे, गुगल पे यांसारख्या यूपीआय अॅप्स तसेच एसबीआय पीओएस मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा कल रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांकडे वाढत असल्याची माहिती पुणे डाक क्षेत्राचे संचालक अभिजीत बनसोडे यांनी दिली.
सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत पुणे डाक क्षेत्रातील चार जिल्ह्यांमधील विविध पोस्ट ऑफिसमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार यशस्वीरीत्या पार पडत आहेत. स्पीड पोस्ट पत्र व पार्सल, मनी ऑर्डर, मोठ्या प्रमाणातील टपाल बुकिंग, विविध बिलांचे भुगतान, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फ्रैंकिंग मशीन रिचार्ज या सर्व सेवांसाठी आता प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून किंवा डेबिट कार्डद्वारे डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिजिटल पेमेंट सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून रोख रक्कम किंवा सुट्टे पैसे जवळ ठेवण्याचा त्रास टळत आहे. परिणामी काउंटरवरील व्यवहार अधिक जलद आणि सुलभ झाले आहेत, या सुविधांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी सक्रियपणे मदत करत असून संबंधित माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून ‘तुमचा मोबाईलच तुमचे पाकीट’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. भविष्यात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल आणि ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला डाक विभागामार्फत अधिक बळ मिळेल, असा विश्वास पुणे डाक विभागाचे संचालक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: AI Jobs Growth in India: २०२५ मध्ये भारतात एआय नोकऱ्यांचा होणार स्फोट; ३२% वाढीचा अंदाज
सप्टेंबर महिन्यात सुमारे ७१.८५ पेक्षा अधिक डिजिटल व्यवहार नोंदवले गेले असून, त्यातून सुमारे ६३.३० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे, ऑक्टोबर महिन्यात डिजिटल व्यवहारांची संख्या एक लाखांहून अधिक झाली असून महसूल बेट १.२९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत। डिजिटल व्यवहारांमधून सुमारे १.५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे मागील तिमाहीत एकूण सुमारे ३.६२ लाख डिजिटल व्यवहारांमधून अंदाजे ३.८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे.