“उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली”, असं म्हणणारे अलार्म काकांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर विविध भाषेतील जाहिरातीतून संपूर्ण भारतीयांची मनं जिंकून घेतली. दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला आठवतात ते अलार्म काका आणि मोती साबण. दिवाळीचं अभ्यंगस्नान म्हटलं की पहाटे उटणं लावून अंघोळ करणं ही परंपरा पुर्वापार सुरु आहे. मात्र मधल्या काळात त्याच परंपरेशी जोडला गेला तो मोती साबण. दिवाळीच्या माहोलमध्ये या साबणाचा राजेशाही थाट असतो, साबणामध्ये सर्वाधिक विक्री होते ती मोती साबणाची. पण असं का ? दिवाळीत याचं इतकं महत्व का आहे, या मागे देखील एक किस्सा आहे.
गोदरेज कंपनीने 1959 मध्ये भारतात सर्वात महागडा साबण लॉन्च केला. या साबणाचं नाव अर्थात मोती साबण. पहिल्या वाहिल्या भारतीय रॉयल साबणाच्या जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात कंपनीने खर्च केला. मात्र एवढं करूनही साबणाचा म्हणावा तसा खप काही झालाच नाही. पण काही वर्षांनी हा ब्रँड आला तो टाटा ग्रुपकडे. त्यावेळी टाटा समुहाने एक युक्ती लढवली. वर्षातली सर्वात राजेशाही अंघोळ कधी असते तर ती दिवाळीत. तेव्हा टाटा यांनी मोती साबणाकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोनच बदलून टाकला.
टाटा यांनी असं केलं तरी काय ? तर, मोती साबणाचा दिवाळी सणासाठीचा रॉयल साबण अशाच अर्थानेच त्याची जाहिरात केली. त्यानंतर खास दिवाळीसणासाठी याला ओळख मिळाली. हा साबण सेलिब्रिटी बनला खरा पण सुपरस्टार झाला ते अलार्म काकांच्या जाहिरातीमुळे. 2013 मध्ये या मोती साबणाला फेम मिळाला.अलार्म काकांच्या जाहिरातीचं स्लोगन आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. खूप प्रोडक्टच्या जाहिराती बाजारात येतात पण खूप कमी जाहिरात वर्षानुवर्षे लोकांच्या लक्षात राहतात. त्यातीलच एक जाहिरात म्हणजे मोती साबणाची. जेव्हा अलार्म काका म्हणतात , उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली.
भारतात बहुतांश वर्ग हा मध्यमवर्गीय आहेत. चाळीत राहणारे आहेत. आज जरी काही जण मोठे सुपरस्टार असतील किंवा मोठ्या पदावर कामाला असतील मात्र अनेकांचं बालपण हे चाळीत गेलेलं आहे. चाळ संस्कृती आजकाल जरी कमी होताना दिसत असली तरी चाळीतली दिवाळी आणि चाळकऱ्यांची लगबग उत्साह या जाहीरातून पुरेपुरे टिपला गेलाय. विकीपीडियाच्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात या साबणामुळं कंपनीला 100 कोटींपर्यंतचा नफा मिळतो. भावनिक जोड दिल्याने मोती साबणाची ही जाहीरात प्रत्येकाच्या जवळची झाली. अगदी आजच्या काळातही चाळीतून हाय सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये रहायला गेलेल्यांना देखील मोतीसाबण दिवाळीत तितकाच महत्वाचा वाटतो. याचकारणाने दिवाळी म्हटली की मोती साबण असंही एक समीकरण तयार झालेलं आहे.