सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान देत, नैसर्गिक सौंदर्याला प्रोत्साहन देणारा फे ब्यूटी ब्रॅण्ड शार्क टँक इंडिया ४ मध्ये सहभागी होत आहे. करिष्मा केवलरामानी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या ब्रॅण्डने अस्सल सौंदर्यप्रसाधनांद्वारे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या त्वचेचा स्वीकार करण्याची प्रेरणा दिली आहे. प्रारंभीच्या आव्हानांवर मात करत, त्यांनी समावेशकतेचा प्रचार आणि भारतीय त्वचेसाठी उपयुक्त उत्पादने विकसित करण्यावर भर दिला आहे. व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवणाऱ्या फे ब्यूटीच्या दृष्टिकोनाचे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे.
शोमध्ये करिष्मा यांनी कंपनीतील १ टक्का इक्विटीसाठी १ कोटींची मागणी केली. या मागणीमधून फे ब्यूटीच्या उत्पादनांवरील विश्वास आणि त्यांच्या नवोन्मेषक दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. प्रेक्षक आणि शार्क्स यांच्या मनात उत्सुकता आहे की या ब्रॅण्डमध्ये गुंतवणूक केली जाईल का.
करिष्मा केवलरामानी यांनी शार्क टँक इंडिया ४ अनुभवाबद्दल सांगताना म्हटले, “हा खरोखरच स्वप्नवत अनुभव होता. चित्रिकरणापूर्वी भीती होती, पण माझ्याकडे सांगण्यासाठी अनोखी गोष्ट आहे आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात बदल घडवणारा ब्रॅण्डही आहे, हे मला ठाऊक होते. प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळण्याचा आणि ऐकले जाण्याचा हक्क आहे, असे मला वाटते. त्वचेचा रंग किंवा पोत कोणताही असो, प्रत्येकाला सौंदर्याची भावना अनुभवण्याचा अधिकार आहे. फे ब्यूटीमध्ये आम्ही परवडणारी, सहज उपलब्ध, नवोन्मेषकारी आणि प्रभावी उत्पादने तयार करत आहोत. आम्ही केवळ मेक-अप उत्पादने तयार करणारा ब्रॅण्ड नसून उद्योगात समावेशकतेची निश्चिती करण्यासाठी काम करत आहोत. आमचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी शार्क टँक इंडियाने आम्हाला दिली आहे.”
या सीझनमध्ये शार्क टँक इंडिया ४ च्या पॅनेलमध्ये उद्योगक्षेत्रातील प्रतिष्ठित दिग्गजांचा समावेश आहे. यात अनुपम मित्तल (शादी.कॉम संस्थापक), नमिता थापर (एमक्युअर फार्मा कार्यकारी संचालक), विनीता सिंग (शुगर कॉस्मेटिक्स सहसंस्थापक), अमन गुप्ता (बोट लाइफस्टाइल सहसंस्थापक) आणि इतर अनेक प्रख्यात उद्योजक सहभागी झाले आहेत. या उद्योजकांनी भारतातील विविध उद्योगांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे आणि आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. शार्क टँक इंडिया ४ या नव्या हंगामाची सुरुवात सोमवार, ६ जानेवारीपासून होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन स्टार्टअप्सचे अनोखे आयडियाज, त्यांची मेहनत, आणि शार्क्सचा निर्णायक दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना फे ब्यूटीच्या पिचचा निकाल काय लागतो आणि त्यांचा पुढील प्रवास कसा घडतो, याची उत्सुकता आहे. या रोमांचक प्रवासाचा आनंद घ्या, दर सोमवार ते शुक्रवार, रात्री ८ वाजता, फक्त सोनी लिव्हवर!