1 लाखाचे झाले 84 लाख रुपये; चित्रपट क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा!
शेअर बाजारात शुक्रवारी (ता.3) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ७२०.६० अंकांनी घसरून, ७९,२२३.११ अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १८३.९० अंकांच्या घसरणीसह २४,००४.७५ अंकांवर बंद झाला आहे. यात मनोरंजन, संगीत आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील कंपनी टिप्स म्युझिकच्या शेअर्सची देखील घसरण झाली आहे. मात्र, या शेअरने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले आहे. या शेअर्सने 5 वर्षात 8371.26 टक्के परतावा दिला आहे. टिप्स म्युझिक हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात दुप्पट केले आहेत.
टिप्स म्युझिकचे शेअर्स विक्रीच्या दबावामुळे दिवसभरात 4 टक्के घसरले आहे. दिवसाअखेरीस शेअर्स 711.10 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 9000 कोटी रुपयांवर आले आहे. टिप्स म्युझिकचे जुने नाव टिम्स इंडस्ट्रीज होते. ही एक संगीत रेकॉर्ड लेबल आणि चित्रपट निर्मिती, जाहिरात आणि वितरण कंपनी आहे. कंपनीची सुरुवात 1975 मध्ये कुमार एस. तौरानी आणि रमेश एस. तौरानी यांनी केली होती.
टिप्स म्युझिकच्या शेअर्सची किंमत 5 वर्षांपूर्वी 5.5 रुपये होती. त्यामुळे एखाद्याने 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 हजार रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील, तर गुंतवणूक 17 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांची गुंतवणूक 42 लाख रुपये आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 84 लाख रुपये झाली असती.बीएसईच्या आकडेवारीनुसार, टिप्स म्युझिकच्या शेअरची किंमत एका आठवड्यात 10 टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. सप्टेंबर 2024 अखेर प्रवर्तकांकडे कंपनीत 64.15 टक्के हिस्सा होता.
‘हा’ पेन्नी स्टॉक 5 शेअरवर 3 बोनस देणार, 17 जानेवारी 2025 ही असेल रेकॉर्ड डेट!
जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीत टिप्स म्युझिकचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 145 टक्क्यांहून अधिक वाढीसह 48.16 कोटी रुपयांवर नोंदवला गेला. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत हा आकडे 19.64 कोटी रुपये होता. ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल वार्षिक 32 टक्क्यांनी वाढून 80.61 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी महसूल 60.87 कोटी रुपये होता.
टिप्स म्युझिकचा एप्रिल-सप्टेंबर 2024 या सहामाहीतील ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल वार्षिक 36 टक्क्यांनी वाढून 154.52 कोटी रुपये झाला आहे. तर निव्वळ नफा वार्षिक 39 टक्क्यांनी वाढून 91.72 कोटी रुपये झाला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)