जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत २३व्या स्थानावर घसरले..
Gautam Adani Marathi News: देशांतर्गत शेअर बाजार सलग आठ सत्रांपासून घसरत आहे. यामुळे भारतीय श्रीमंतांच्या निव्वळ संपत्तीत घट झाली आहे. भारतीय शेअर बाजारातील प्रचंड घसरणीचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीवर दिसून येत आहे. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत देखील मोठी घसरण झाली आहे. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या दोघांचीही क्रमवारी घसरली आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २३ व्या स्थानावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, शुक्रवारी त्यांची एकूण संपत्ती २.७३ अब्ज डॉलर्सने कमी झाली.आता त्यांची एकूण संपत्ती ६६.१ अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांची एकूण संपत्ती १२.६ अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. यामुळे आता ते आशियाई श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याचा धोका आहे. चीनचे झोंग शानशान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २४ व्या क्रमांकावर आहेत आणि ५७.४ अब्ज डॉलर्ससह आशियात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत यावर्षी ४.५५ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते ८६.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७ व्या क्रमांकावर आहेत. एचसीएलचे शिव नाडर यांना या वर्षी ४.१४ अब्ज डॉलर्स, शापूरजी मिस्त्री यांना २.१८ अब्ज डॉलर्स, अझीम प्रेमजी यांना १८८ दशलक्ष डॉलर्स, सावित्री जिंदाल यांना ५.२० अब्ज डॉलर्स आणि सन फार्माचे दिलीप संघवी यांना ३.४० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क पहिल्या स्थानावर आहेत तर मार्क झुकेरबर्ग दुसऱ्या स्थानावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांच्या एकूण संपत्तीत यावर्षी ३४.१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती ३९८ अब्ज डॉलर आहे. दुसरीकडे मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या एकूण संपत्तीत यावर्षी ५२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती २५९ अब्ज डॉलर्स आहे.
फेब्रुवारी महिन्यातच शेअर बाजारात २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ३१ जानेवारी २०२५ रोजी, मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ७७,५००.५७ अंकांवर दिसला, जो आता ७५,९३९.२१ अंकांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्समध्ये १,५६१.३६ अंकांची घसरण झाली आहे. याचा अर्थ सेन्सेक्समुळे गुंतवणूकदारांचे २ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.