...एक रुपयासाठी प्राप्तिकर विभागाची नोटीस; करदात्याला खर्च करावे लागले 50 हजार रुपये!
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची तारीख जवळ आली की, अनेकांच्या डोकेदुखीत वाढ होते. अनेकांसाठी आयटीआर भरणे म्हणजे मोठे जिकरीचे काम असते. त्याला कारणही तसेच आहे. आयटीआर भरताना थोडी जरी चूक झाली तर सरकारच्या प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येते. आता असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. विशेष म्हणजे केवळ एक रुपयासाठी प्राप्तिकर विभागाकडून या व्यक्तीला नोटीस मिळाली आहे. ज्यामुळे त्याला मोठया मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सध्या समाजमाध्यमांवर एका व्यक्तीला प्राप्त झालेल्या प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीची सर्वदूर चर्चा आहे. एका करदात्याने आपला आयटीआर रिटर्न भरताना केवळ एक रुपयाची गफलत केली होती. मात्र, आता त्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाली असून, त्या एक रुपयामुळे संबंधित करदात्याला तब्बल ५० हजार रुपये सीएला देण्यासाठी घालवावे लागले आहे. याबाबत स्वतः संबंधित करदात्यानेच समाजमाध्यमावर पोस्ट करत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाकडून केवळ १ रुपयांच्या घोळासाठी नोटीस आल्याने, त्याने समाजमाध्यमावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
काय म्हटलंय करदात्याने आपल्या पोस्टमध्ये?
अपूर्व जैन असे या करदात्याचे नाव असून, 8 जुलै रोजी त्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. त्याने आपल्या समाजमाध्यमवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाली होती. मात्र, या नोटिशीमध्ये काय माहिती देण्यात आली हे न वाचताच एका सीएला हे प्रकरण मिटवण्यासाठी संपर्क साधला होता. त्यासाठी त्यास ५० हजारांची फी देखील दिली होती. मात्र, त्यांना नंतर समजले की केवळ एक रुपयासाठी प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. अर्थात त्याला एक रुपयासाठी ५० हजार रुपये खर्च करावे लागले आहेत.
Paid 50000/- fee to CA for a IT notice I received recently wherein the final disputed value turned out to be Re 1/-.
I am not joking. 🙃— Apoorv Jain (@apoorvjain_1988) July 8, 2024
ट्विट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल
दरम्यान, अपूर्व जैन यांनी आपल्या नाराजीचे केलेले ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. नेटकरी देखील याबाबत खरमरीत प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकार प्राप्तिकर विभागाच्या देखील निदर्शनास आला असून, प्राप्तिकर विभागाने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तर अपुर्वने शेवटी प्राप्तिकर विभागाच्या कार्यशैलीत सुधारणा व्हावी, अशी मागणी केली आहे.