फोटो सौजन्य - Social Media
“इंजिनियरिंग केली की पैसा आपोआप मिळतो” असे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल. मात्र, पैसा कमावण्यासाठी इंजिनियरिंगच करावी लागते असे नाही, हे कर्नाटकातील उडुपीचे केल्विन अरानहा आणि फरीश अनफल यांनी दाखवून दिले आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पारंपरिक नोकरीचा मार्ग न निवडता आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आज ते दरमहा लाखोंची कमाई करत आहेत.
केल्विन आणि फरीश यांनी मॅंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनियरिंग (MITE) मधून पदवी मिळवली. शिक्षणानंतर केल्विन बेंगळुरूमध्ये नोकरीला लागला, तर फरीशने छोटा सी-फूड व्यवसाय सुरू केला. या काळात फरीशला शेतकऱ्यांच्या अडचणी आणि हवामान बदलामुळे शेतीत होत असलेल्या तोट्याची जाणीव झाली. दोघांनी मिळून यावर तोडगा काढण्याचे ठरवले.
2021 मध्ये केल्विनने नोकरीचा राजीनामा देऊन फरीशसोबत उडुपीत एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला. स्वतःच्या पैशातून त्यांनी चार महिन्यांत प्रोटोटाइप तयार केला आणि Krop AI या कंपनीची स्थापना केली. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी मातीशिवाय, कमी पाण्यात उच्च गुणवत्तेची पिके घेण्यास सुरुवात केली. कर्नाटकातील ब्रह्मवरामध्ये त्यांनी AI-आधारित वर्टिकल फार्म उभारला, ज्यात लेट्यूस, तुलसी, केल, पार्सले यांसारखी पिके घेतली जातात, जी भारतात फारशी घेतली जात नाहीत.
पारंपरिक शेती पाऊस, मातीची सुपीकता आणि कीटकनाशकांवर अवलंबून असते, त्यामुळे हवामानातील बदल किंवा मातीच्या गुणवत्तेत घसरण यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होते आणि ते कर्जबाजारी होतात. केल्विन आणि फरीश यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून हे आव्हान सोडवण्याचा प्रयत्न केला. हायड्रोपोनिक्समध्ये 95% पाणी वाचते आणि उत्पादन खर्च 50% ने कमी होतो. नियंत्रित वातावरणात कृत्रिम प्रकाशात पिके घेता येतात, त्यामुळे हवामानावर अवलंबून राहण्याची गरज नसते.
AI प्रणाली तापमान, आर्द्रता, pH, पाण्याची गुणवत्ता आणि हवेचे तापमान नियंत्रित करते. त्यांनी खास LED लाईट्स वापरल्या आहेत ज्या फक्त पिकांसाठी आवश्यक प्रकाशतरंग तयार करतात, ज्यामुळे फोटोसिंथेसिससाठी आदर्श प्रकाश मिळतो.
फरीश यांच्या मते, पारंपरिक वर्टिकल फार्मिंगमध्ये 1 किलो स्ट्रॉबेरी उगवण्याचा खर्च 800 रुपये असतो, तर AI-आधारित हायड्रोपोनिक्समध्ये तो केवळ 300 रुपये असतो. त्यांच्या एका सेटअपची किंमत 5 लाख असून, त्यातून 500 लेट्यूस झाडे घेतली जाऊ शकतात. आतापर्यंत त्यांनी 10 अॅग्री-उद्योजक आणि कंपन्यांसाठी फार्म उभारले आहेत. 2023 मध्ये त्यांनी 50 लाख रुपयांची कमाई केली, म्हणजेच दरमहा 4 लाखांहून अधिक, आणि त्यात 40% नफा मिळवला.
त्यांची यशोगाथा दाखवते की, योग्य तंत्रज्ञान आणि दूरदृष्टी वापरल्यास शेती हा उच्च उत्पन्न देणारा आणि टिकाऊ व्यवसाय ठरू शकतो.