
जीवन विम्याचा हप्ता कसा ठरतो? अॅक्च्युअरींच्या तीन सूत्रांचा मोठा खुलासा..; जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर
Life Insurance News: जीवन विमा पॉलिसी घेताना आपल्याला पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, “माझा प्रीमियम हप्ता नक्की किती असेल आणि तो कोण ठरवतो?” तुमच्या जीवन विम्याचा प्रीमियम निश्चित करण्यामागे एक अत्यंत गुंतागुंतीची आणि वैज्ञानिक प्रक्रिया असते, ज्याचे नेतृत्व करतात अॅक्च्युअरी तज्ज्ञ. हे तज्ज्ञ विमा कंपनीचे ‘जोखीम व्यवस्थापक’ म्हणून काम करतात आणि बाजारातील चढ-उतारातही तुमची पॉलिसी सुरक्षित राहील याची खात्री करतात.
अॅक्च्युअरी तज्ज्ञ तुमच्या विम्याचा हप्ता कसा ठरवतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही इंडिया फर्स्ट लाईफच्या मुख्य अक्युच्युअरी भावना वर्मा यांच्याशी संवाद साधला. त्यातून विम्याचा हप्ता ठरवण्याचे तीन प्रमुख टप्पे समोर आले.
१. पॉलिसीची रचना आणि भविष्यातील जोखमीचे आराखडे बांधणी
जीवन विमा पॉलिसी ही एका व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करून तयार केली जाते. त्यामुळे या पॉलिसीची रचना, त्यांचे मूल्य ठरवणे आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांचा हिशेब ठेवणे यासाठी अॅक्च्युअरी तज्ज्ञांचे ज्ञान आणि सांख्यिकी तंत्रे अत्यंत महत्त्वाची ठरतात. कोणतीही दीर्घकालीन योजना तयार करताना किंवा तिचा प्रीमियम निश्चित करताना, हे तज्ज्ञ खालील आर्थिक बाबींवर आधारित आडाखे बांधतात. यामध्ये भविष्यात पॉलिसीधारकाचा मृत्यू होण्याची किंवा दावा दाखल होण्याची शक्यता किती आहे, याचा विचार केला जातो. तसेच, कंपनीला भविष्यातील गुंतवणुकीतून किती फायदा होईल, ज्याचा वापर दावा देण्यासाठी केला जाईल. याचाही अभ्यास केला जातो.
त्याचप्रमाणे,
२. प्रीमियममध्ये डिजिटायझेशनचा स्पर्श
सध्याच्या डिजिटायझेशनच्या युगात आणि प्रचंड मोठ्या डेटाच्या साठ्यामुळे, अॅक्च्युअरी तज्ज्ञ आता प्रीमियम निश्चितीमध्ये नावीन्य आणत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून मशीन लर्निंग आणि अंदाज बांधणारी मॉडेल्स यांसारख्या आधुनिक तंत्रांमुळे, अॅक्च्युअरी तज्ज्ञ आता जोखीमेचा अंदाज अधिक चांगल्या पद्धतीने बांधू शकतात. त्यामुळे याचा थेट फायदा प्रीमियम निश्चितीमध्ये होतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जोखीम प्रोफाइलनुसार प्रीमियम अधिक योग्यरित्या ठरवण्यास मदत मिळते. उदा. वेलनेस इन्सेन्टिव्ह: काही योजनांमध्ये ‘वेलनेस इन्सेन्टिव्ह’ दिले जातात. उत्तम जीवनशैली (Good Health) राखणाऱ्यांना कमी प्रीमियम भरावा लागतो किंवा इतर फायदे मिळतात. तसेच, प्रीमियम निश्चित करण्यापलीकडे, हे तज्ज्ञ डेटा सायन्सचा वापर करून फसवणूक कशी ओळखायची आणि ग्राहक पुढच्या वर्षी प्रीमियम भरणार की नाही, याचे अंदाज लावणारी मॉडेल्सही तयार करतात.
हेही वाचा : Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा
३. पॉलिसीधारकांच्या हिताची सुरक्षा
प्रीमियम निश्चित झाल्यानंतरही, विमा कंपनीने ग्राहकांना दिलेली दीर्घकालीन आश्वासने पूर्ण करण्यासाठी अॅक्च्युअरी तज्ज्ञ सतत काम करत असतात. ते प्रत्येक पॉलिसी श्रेणीसाठी ‘दायित्व-आधारित मालमत्ता व्यवस्थापन’ (Asset-Liability Management) करण्याची शिफारस करतात, ज्यामुळे आर्थिक जोखीम नियंत्रणात राहते. तसेच, जीवन विमा हा मुळातच जोखीमेचा व्यवसाय असल्याने, पॉलिसीधारकांचे हित नेहमी जपले जावे यासाठी योग्य आर्थिक तरतुदी ठेवण्याची जबाबदारी अॅक्च्युअरी तज्ज्ञांवर असते. ते जोखीम-आधारित भांडवल संरचना आणि IFRS17 यांसारख्या नवीन लेखा मानकांचे पालन करतात. यामुळे कंपनीकडे महामारीसारख्या अतिगंभीर परिस्थितीतही दाव्यांसाठी आवश्यक असलेले भांडवल (Capital) उपलब्ध राहील याची खात्री होते.
थोडक्यात, तुमच्या जीवन विम्याचा प्रीमियम अॅक्च्युअरी तज्ज्ञ हे उपलब्ध डेटा, सांख्यिकीय तंत्रे, भविष्यातील आर्थिक अंदाज, कंपनीचा खर्च आणि महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या वयोगटातील मृत्यूदराचा सखोल अभ्यास करून ठरवतात. हे तज्ज्ञच विमा कंपन्यांच्या धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्यामुळे तुमची पॉलिसी बाजारातील चढ-उतारातही सुरक्षित राहते