'ब्लू डॉट् एआय इकॉनॉमी’ डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवार आणि उद्योगांची सांगड
‘ब्लू डॉट् एआय इकॉनॉमी’ उपक्रमातून जास्तीत जास्त उमेदवार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. उमेदवारांची कौशल्ये आणि उद्योगांची मनुष्यबळविषयक गरज यांची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सांगड घालून रोजगार प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार आहे. प्रायोगिक प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे या उपक्रमाच्या विस्ताराची शक्यता तपासली जाईल.
पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
या प्रकल्पासाठी निधीची तरतूद प्रस्तावित आहे. एकस्टेप फाउंडेशनने विकसित केलेला ‘ब्लू डॉट् एआय इकॉनॉमी’ उपक्रम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या तत्त्वांवर आधारित आहे. या माध्यमातून वैयक्तिक गरजा आणि भौगोलिक स्थितीनुसार स्थानिक अर्थव्यवस्थेतील रोजगाराची मागणी व पुरवठ्याचा शोध घेता येणार आहे. उपजीविका, शिक्षण व प्रशिक्षण,सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक सहभाग या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. नागरिक, उद्योजक, उद्योग आणि विविध संस्थांना परस्परांशी जोडून स्थानिक कौशल्ये, संसाधने व आर्थिक संधींचा प्रभावी वापर करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
एनएसडीसीसोबतच्या सामंजस्य करारानुसार कौशल्य योजनांचे मूल्यमापन, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास, भविष्यकालीन कौशल्य प्रशिक्षण, उद्योगसंलग्न प्रशिक्षण आणि महिला उद्योजकता या क्षेत्रांत संयुक्तपणे काम करण्यात येईल. मुंबईत ‘स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ सुरू करण्यात येणार असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांत जागतिक कौशल्य प्रशिक्षण संस्था विकसित करण्यात येणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ऑटोमेशन, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डेटा विश्लेषण या आधुनिक क्षेत्रांत उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्यात येईल. जर्मन, जपानी व इंग्रजी भाषांचे प्रशिक्षण, परदेशी नियोक्त्यांशी समन्वय आणि आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी उमेदवारांना मार्गदर्शन केले जाईल. उद्योगसंलग्न कौशल्य परिसंस्था आणि शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण बळकट करण्याबरोबरच महिला उद्योजकांना बाजारपेठ, डिजिटल वाणिज्य, आर्थिक साक्षरता आणि मार्गदर्शनाशी जोडण्यासाठी दोन्ही संस्था सहकार्य करणार आहेत.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. अमित सैनी, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, कौशल्य आयुक्तालयचे उपआयुक्त सचिन जाधव, एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार पिल्लई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा सहायक आयुक्त (कौशल्य विकास) शैलेश भगत आणि एकस्टेप फाउंडेशनचे कार्यक्रम संचालक इकप्रित सिंग उपस्थित होते.
‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?






