मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर गुगल फॉर्मची लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZsMPGIodkUXWu5Su2DRtFEVnyWb2SjFepoxkOqUcfdSe97g/viewform) उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी खालील लिंकवर जाऊन आपली मते, सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.
Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (PETE) या उपक्रमाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना प्राधान्य देत आधुनिक, शास्त्रीय आणि नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पेटकेअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, या क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक तसेच पाळीव प्राण्यांचे संगोपन करणारे नागरिक यांच्यासाठी विविध मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या प्रशिक्षणामध्ये पेट हँडलिंग, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, पेट ग्रूमिंग आणि पाळीव प्राण्यांसाठी निवास व देखभाल सुविधा व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश असेल. प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार असून, आधुनिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्ये आत्मसात करता येतील. तसेच, पाळीव प्राण्यांचे आरोग्य, संगोपन आणि कल्याण याविषयी माहिती देणारे ऑनलाइन अभ्यासक्रमही पेट पॅरेंट्ससाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग इकोसिस्टिम (PETE) हा पाळीव प्राण्यांची देखभाल आणि प्राणी कल्याणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून पाळीव प्राण्यांना जागतिक दर्जाच्या सेवा व योग्य काळजी मिळण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मदत होईल. तसेच, या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास चालना मिळेल.
पाळीव प्राण्यांचे जीवनमान उंचावण्यासोबतच त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींची कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुंबईतही अशी संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेऊन पुढील नियोजन करण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.






