फोटो सौजन्य - Social Media
मेटाने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत मोठा धोरणात्मक सहयोग जाहीर केला आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत मेटाचे ओपन-सोर्स लामा एआय मॉडेल्स आणि रिलायन्सच्या मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांचा संगम होणार असून भारतीय उद्योगांसाठी एआय आधारित नव्या पिढीची सोल्यूशन्स विकसित केली जातील. या भागीदारीचा प्राथमिक उद्देश विक्री, विपणन, आयटी, ग्राहक सेवा आणि वित्त या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उद्योग-विशिष्ट एआय सोल्यूशन्स तैनात करणे हा आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांपासून ते लघु उद्योग आणि स्टार्टअप्सपर्यंत सर्वांना तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे.
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या सहयोगाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले, “भारतामध्ये एआयचा लोकशाहीकरणाचा प्रवास गतीमान करण्यासाठी रिलायन्ससोबत हातमिळवणी करताना आम्हाला अभिमान वाटतो. मेटाच्या लामा मॉडेल्सना प्रत्यक्ष उद्योगात वापरात आणून भारतीय व्यवसायांना जागतिक स्तरावरची एआय क्षमता मिळेल.”
या उपक्रमाचा सर्वात मोठा आधार असेल जिओचे विस्तृत कनेक्टिव्हिटी नेटवर्क आणि आरआयएलचे प्रगत एआय डेटा सेंटर्स. या सशक्त पायाभूत सुविधांमुळे कंपन्यांना कमी खर्चात उच्च कार्यक्षम एआय मॉडेल्स तैनात करण्याची सोय होईल. यासोबतच क्लाउड, ऑन-प्रिमायसेस आणि हायब्रिड इन्फ्रास्ट्रक्चरवर सोल्यूशन्स चालवण्याची लवचिकता उपलब्ध होईल, ज्यामुळे खर्च नियंत्रणात ठेवून सहज स्केलेबिलिटी साध्य करता येईल.
विशेष म्हणजे या सहयोगामुळे लघु व मध्यम उद्योग (एसएमबी), स्टार्टअप्स आणि स्थानिक व्यवसायांना एआय अधिक परवडणारे आणि सुलभ होणार आहे. सुरक्षित आणि उद्योग-विशिष्ट अॅप्लिकेशन्समुळे नाविन्याला चालना मिळेल, स्पर्धात्मकता वाढेल आणि व्यवसायांची वाढ वेगवान होईल. रिलायन्सकडे असलेली डिजिटल पायाभूत सुविधा आणि मेटाचे सतत सुधारले जाणारे एआय मॉडेल्स यांचा मिलाफ भारतीय व्यवसायांसाठी नवे दरवाजे उघडणार आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहक अनुभव उंचावणे, प्रक्रिया कार्यक्षम करणे, तसेच नाविन्यपूर्ण व्यावसायिक मॉडेल्स साकार करणे शक्य होईल.
या धोरणात्मक सहयोगातून मेटा व रिलायन्स भारतात स्केलेबल, सुरक्षित आणि परवडणारे एआय सोल्यूशन्स उपलब्ध करून देत डिजिटल परिवर्तन आणि विकासाच्या नव्या युगाची सुरूवात करत आहेत.