इस्रायलमध्ये महिना 2 लाख रुपये कमावण्याची संधी; भारतात शोधले जातायेत कामगार, हजारो कामगारांची गरज!
इस्रायल या देशाने 10 हजार बांधकाम कामगार आणि 5 हजार काळजीवाहू आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी भारताशी संपर्क साधला आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनसीडीसीच्या हवाल्याने एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ज्या कामगारांचा शोध घेतला जात आहे, त्यांना दरमहा १.९२ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. देशातील आघाडीची वृत्तसंस्था असलेल्या पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
पॅलेस्टिनी कामगारांवरील बंदीचा परिणाम
दरम्यान, गेल्या वर्षी सुरू झालेल्या हमासबरोबरच्या युद्धानंतर इस्रायलच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले, जे अद्याप थांबलेले नाही. यासोबतच इस्रायलने १ लाखाहून अधिक पॅलेस्टिनी कामगारांवर बंदी घातली आहे. या कारणास्तव, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरज निर्माण आहे.
(फोटो सौजन्य – istock)
निवड प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह
मात्र, दुसरीकडे इस्रायलमधील नोकऱ्यांबाबत सुरू असलेल्या द्विपक्षीय जॉब स्कीमवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी लोक आधीच इस्रायलमध्ये गेले आहेत. त्यापैकी अनेकजण परतले आहेत. सुमारे 10 हजार कामगार इस्रायलमध्ये सरासरी 1.9 लाख रुपये मासिक पगारावर काम करण्यासाठी गेले आहे. त्यापैकी काही बांधकाम किंवा कारखान्यांमध्ये काम करण्यास अयोग्य आढळले. त्यानंतर त्या लोकांना साफसफाईच्या काम देण्यात आले. त्यानंतर बरेच लोक परतले. त्यामुळे द्विपक्षीय नोकरी योजनेंतर्गत लोकांची निवड करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
भरतीची ही फेरी महाराष्ट्रात आयोजित केली जाणार
एनसीडीसीचे म्हणणे आहे की या प्रकरणी, इस्रायलमधून लोकसंख्या, इमिग्रेशन आणि बॉर्डर अथॉरिटीचे (पीआयबीए) एक पथक पुढील आठवड्यात भारतात येत आहे. या पथकाकडून फ्रेमवर्क, लोखंडी वाक मशीन वापरकर्ता, प्लास्टरिंग, सिरेमिक टाइलिंग यांसारख्या कामांसाठी उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाईल. पात्र ठरलेल्यांची इस्रायलमधील नोकऱ्यांसाठी निवड केली जाईल. बांधकाम कामगारांच्या भरतीची ही फेरी महाराष्ट्रात आयोजित केली जाणार आहे.