सचिनने गुंतवले आहेत 'या' शेअरमध्ये तब्बल इतके कोटी; सहा महिन्यात पैसे झाले अडीच पट!
गेल्या काही काळापासून शेअर बाजार मोठी उसळी घेत आहे. अशातच आता शेअर बाजार लवकरच ९० हजार अंकांपर्यंत झेपावू शकतो. असा अंदाज जाणकारांकडून बांधला जात आहे. ज्यामुळे सध्या गुतवणूकदारांमध्ये आनंदीआनंद पाहायला मिळत आहे. अशातच आता संरक्षण क्षेत्रातील एक स्टॉक मल्टिबॅगर स्टॉक म्हणून समोर आला आहे. विशेष म्हणजे या शेअरमध्ये क्रिकेटचा भगवान मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यातून सचिनला अडीच पटीने फायदा झाल्याचे समोर आले आहे.
काय आहे या कंपनीचे नाव?
संरक्षण क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचे नाव आझाद इंजिनिअरिंग असे असून, ही कंपनी गेल्या काही काळापासून मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीसध्ये समाविष्ट आहे. विशेष म्हणजे खूपच कमी कालावधीत या कंपनीचे शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरने मागील सहा महिन्यात जवळपास 150 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीवर अडीच पट अधिक फायदा झाला आहे.
मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी
शुक्रवारी (ता.१२) बाजार बंद होताना आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये 2.59 टक्क्यांची तुफानी वाढ पाहायला मिळाली होती. ज्यामुळे बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 1741 रुपयांवर बंद झाला होता. विशेष म्हणजे शेअरमध्ये आलेल्या तेजीचा परिणाम हा कंपनीच्या मार्केट कॅपवर देखील पाहायला मिळाला. कंपनीचा मार्केट कॅप शुक्रवारी 10280 कोटींपर्यंत वाढलेला पाहायला मिळाला.
सहा महिन्यात 154.09 टक्के परतावा
विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 154.09 टक्के परतावा मिळाला आहे. अर्थात या कंपनीच्या शेअरमध्ये एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्यांना आता सहा महिन्यानंतर तब्बल अडीच लाख रुपये इतका परतावा मिळणार आहे.
किती केलीये सचिनने गुंतवणूक?
सचिन तेंडुलकर याने आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये मागील वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये जवळपास ५ कोटींची गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सचिनला या कंपनीचे ४ लाख शेअर्स मिळाले होते. त्यातच आता मागील वर्षभरापासून आणि गेल्या सहा महिन्यात आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर याला या कंपनीच्या शेअरमधून तगडा परतावा मिळणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)