
Samruddhi Expressway Toll: समृद्धी महामार्गाला तीन वर्षे पूर्ण, धावली तीन कोटी वाहने, तर शेकडो कोटींचा महसूल जमा
Samruddhi Expressway Toll: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचा नागपूर – शिर्डी दरम्यानचा पहिला टप्पा सेवेत दाखल होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. तर हा संपूर्ण महामार्ग जून २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला. या तीन वर्षांच्या कालावधीत या महामार्गावरून तीन कोटीहून अधिक वाहने धावली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पथकर वसुलीतून शेकडो कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे. एमएसआरडीसीने नागपूर- मुंबई अंतर केवळ आठ तासांत पार करता यावे यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधला. या महामार्गाचे काम चार टप्प्यांत करून वाहतूक सेवेते दाखल करण्यात आले.
नागपूर – शिर्डीदरम्यानचा ५२० किमी लांबीचा टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी, तर शिर्डी – भरवीर टप्पा मे २०२३ मध्ये, भरवीर – इगतपुरी टप्पा मार्च २०२४ मध्ये, तर इगतपुरी – आमणेदरम्यानचा शेवटचा चौथा टप्पा जून २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला, नागपूर – आमणेदरम्यानचा संपूर्ण महामार्ग जून २०२५ मध्ये कायर्यान्वित झाला. नागपूर – मुंबई असा प्रवास अतिजलद होऊ लागल्याने या महामार्गाला प्रतिसाद वाढत गेला. त्यामुळेच एप्रिल २०२५ ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत समृद्धी महामार्गावरून १ कोटी ५ लाख ११ हजार ७९३ वाहनांनी प्रवास केला, तर या वाहनांकडून ८३४ कोटी रुपये पथकर वसूल करण्यात आला. यावरून संपूर्ण महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले.
तीन वर्षांच्या कालावधीत समृद्धी महामार्गावरून धावलेल्या वाहनांची संख्या आता ३ कोटी २ लाखांवर पोहोचली आहे. पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान महामार्गावरून १३ लाख ५९ हजार वाहने धावली. तर एमएसआरडीसीच्या तिजोरीत पधकराच्या रूपाने १०६ कोटी रुपये जमा झाले. दुसरा टप्पा नागपुर-भरवीर सेवेत दाखल झाल्यानंतर, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान समृद्धीवरून ६८ लाख २९ हजार ३६९ वाहने धावली आणि यातून ५२८ कोटी रुपये महसूल मिळाला.
तिसरा टप्पा सेवेत दाखल होऊन नागपूर – इगतपुरी असा समृद्धी महामार्ग प्रवास अतिजलद झाल्यानंतर समृद्धीवरील वाहनांचा सख्या वाढली, त्यामुळेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान समृद्धीवरून १ कोटी ३४ हजार ८९३ वाहने धावली आणि पथकरातून ७४० कोटी रुपये महसूल मिळाला. अद्याप अपेक्षित वाहनसंख्याचा टप्पा गाठता आला नसला तरी सध्याची वाहनसंख्या समाधानकारक आहे. संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वाहनसंख्या वाढली आहे. यात पुढे आणखी वाढ होईल आणि अपेक्षित वाहनसंख्येचे उद्दिष्टही पूर्ण होईल.