5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले; वाचा... वर्षाअखेर कसा राहील शेअर बाजाराचा मुड!
सलग पाच दिवस भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा कल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारीही कायम असल्याचे दिसून आले. गेल्या पाच दिवसांत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. फक्त शुक्रवारबद्दल बोलायचे झाल्यास, बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स 1176 अंकांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 50 देखील 364.20 अंकांनी घसरून बंद झाला. तथापि, मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंटच्या ताज्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की ही घसरण असली तरी 2024 चा शेवटचा आठवडा शेअर बाजारासाठी आनंदाचा असणार आहे.
बीएसई, एनएसईची घसरण
गेल्या पाच दिवसांतील सततच्या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 441 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. केवळ शुक्रवारीच गुंतवणूकदारांचे ८.७७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईचा सेन्सेक्स या आठवड्यात 5 टक्के घसरला असून, एकूण सेन्सेक्स तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये 1,000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. 13 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 82,133 वर होता, तर शुक्रवारी तो 78,041.59 वर बंद झाला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 13 डिसेंबरच्या 24,768 वरून 23,587.50 वर घसरला आहे.
पाकिस्तानातही मुकेश अंबानींच्या नावाचा जलवा; गुगल 2024 च्या पाकिस्तानी सर्चच्या डेटामधून माहिती समोर
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर मोठा परिणाम
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स शुक्रवारी 1,210.15 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. या आठवड्यात, रिलायन्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 85,525 कोटींनी कमी झाले आहे. ट्रेडिंगच्या शेवटी, रिलायन्सचे शेअर्स 1,206 रुपयांवर बंद झाले आहे. जे त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे.
वर्षाच्या शेवटी बाजारात सुधारणा होण्याची शक्यता
दरम्यान, सध्याच्या घडीला शेअर बाजारात सतत घसरण होत असूनही, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की 2024 हे वर्ष सकारात्मकतेने संपणार आहे. मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंटच्या अलीकडील अहवालानुसार, मजबूत आर्थिक वाढ आणि देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ यामुळे निफ्टी 13 टक्क्यांनी वार्षिक वाढ नोंदवू शकतो.
सर्वसामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने ‘तो’ निर्णय घेण्याचे टाळले; महागाईचा फटका बसणार
अहवालानुसार, भारतीय बाजारपेठेला 2024 मध्ये अनेक जागतिक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. जसे की भू-राजकीय तणाव, भारतातील सार्वत्रिक निवडणुका आणि बजेटसारख्या घटना कारणीभुत ठरल्या आहेत. सप्टेंबरमध्ये निफ्टीने 26,277 चा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मजबूत आर्थिक परिस्थिती आणि कॉर्पोरेट कमाईमुळे बाजार मजबूत राहिला आहे.
2025 मध्ये काय होईल
याशिवाय या अहवालात असेही म्हटले आहे की, वर्ष 2025 मध्ये शेअर बाजाराची कामगिरी दोन भागात विभागली जाऊ शकते. पहिल्या सहामाहीत एकत्रीकरण सुरू राहू शकते. तर दुसऱ्या सहामाहीत बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.