टाटा मोटर्स या भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी, यांनी आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांचा 10वा वार्षिक अहवाल सादर केला आहे. ‘बिल्डिंग टूगेदर ए मिलियन ड्रीम्स’ या शीर्षकाखाली सादर केलेल्या अहवालात कंपनीने10 लाखाहून अधिक व्यक्तींच्या जीवनावर टाकलेला शाश्वत प्रभाव अधोरेखित केला आहे. 40% लाभार्थी अनुसूचित जाती-जमाती समुदायातील असून कंपनीने 26 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील 94 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांपर्यंत पोहोच वाढवली आहे.
टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी टाटा मोटर्सच्या या उल्लेखनीय कार्याचा अभिमान व्यक्त करताना, ‘मोअर फॉर लेस फॉर मोअर’ या धोरणामुळे संसाधनांचा योग्य वापर, कार्यक्रमांचे विस्तारीकरण आणि सामाजिक परिणाम दृढ करण्यास मदत झाल्याचे सांगितले. त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगारक्षमता आणि पर्यावरणीय टिकावाच्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कंपनीच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेवरही भर दिला.
टाटा मोटर्सने नाम फाऊंडेशन, मनरेगा विभाग, आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अमृत सरोवर अभियानांतर्गत ग्रामीण महाराष्ट्रातील १०६ जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले. यामुळे पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये १,८६० दशलक्ष लिटर जलसाठा निर्माण झाला. याचा फायदा पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिंचन आणि कृषी उत्पादनक्षमतेसाठी झाला आहे.
ग्रामीण विकासासाठी इंटीग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम (IVDP) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जव्हारमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने स्थलांतराचे प्रमाण ४५% वरून २५% पर्यंत कमी केले आणि सरासरी कौटुंबिक उत्पन्नात ६०% वाढ केली. अहमदाबादमधील नवापारा येथील १९० कुटुंबांनी मत्स्यपालनाला उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून स्वीकारले, ज्यामुळे स्थलांतर ४०% कमी झाले आणि शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १०% ने घटले.
पालघर जिल्ह्यात १.७ दशलक्ष झाडांची लागवड करून १३,००० शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला. पुण्यातील शहरी वनीकरण उपक्रमात १२.५ लाख झाडे लावली गेली, ज्यामुळे २०० हेक्टर जमिनीत जैवविविधता वाढली आणि कार्बन शोषणात सुधारणा झाली.
ENABLE प्रोग्राम अंतर्गत १८,००० विद्यार्थ्यांना JEE आणि NEET परीक्षांसाठी तयारीसाठी प्रशिक्षण दिले. २०२३-२४ मध्ये, या कार्यक्रमातील २७% विद्यार्थी IIT JEE साठी पात्र ठरले, तर ७९% विद्यार्थी NEET परीक्षेत उत्तीर्ण झाले.
लर्न, अर्न अँड प्रोग्रेस (LEAP) उपक्रमांतर्गत, वंचित समुदायांतील सुमारे १,५०० युवकांना ऑटोमोटिव्ह कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी ८०% युवकांना टाटा मोटर्सच्या इकोसिस्टीममध्ये किंवा बाहेरील क्षेत्रात रोजगार मिळाला.
पुण्यातील आदिवासी कुटुंबांना हिरडा बेरी उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक गट (FPG) स्थापन करण्यात मदत केली. या उपक्रमामुळे ४ तालुक्यांतील ५,००० कुटुंबांना ४ कोटी रुपये महसूल मिळाला.
जमशेदपूरमधील कुपोषण उपचार केंद्राने (MTC) ५,५०० मुलांवर उपचार केले आणि उत्तराखंडमधील परवरिश केंद्रे स्थापन करून आरोग्यसेवा अधिक व्यापक केली.
CSR उपक्रमांमध्ये ५९% कर्मचारी सहभागी झाले, ज्यांनी समुदाय सेवेसाठी १,१७,००० तास स्वयंसेवा केली. या उपक्रमांमुळे टाटा मोटर्सने सीएसआर क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे.