
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सन २०२६ मधील पहिली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून संघटनेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने तीन नवीन सदस्यांची पदाधिकारी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप महाजन, प्रमुख सल्लागार डॉ. नितीन कावेडे, प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष रत्नाकर काळे, सचिव संजय देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ठोसपणे मांडण्यासाठी अजित डेरे, महेश कुलकर्णी आणि श्री. समाधान जाधव यांची नवीन पदाधिकारी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध
यावेळी अध्यक्ष संदीप महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, २०२६ मधील ही पहिली बैठक असून आज झालेल्या निवडीमुळे संघटनेला नवी ताकद मिळाली आहे. संघटना नेहमीच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध राहील. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ न देणे, प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हेच संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, संघटनेची खरी ताकद ही केवळ पदाधिकाऱ्यांमध्ये नसून प्रत्येक सदस्याच्या सक्रिय सहभागात आणि एकजुटीत असते. विद्यापीठाच्या प्रगतीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाटा अत्यंत मोलाचा असून, नवीन वर्षात नव्या ऊर्जेने काम करताना कर्मचाऱ्यांच्या कल्याणासोबतच प्रशासकीय कामकाजातही वेग आणण्याची गरज आहे.
विचारांसोबत कृतीही आवश्यक
केवळ मागण्या मांडणे पुरेसे नाही, तर त्या मागण्यांची शिस्तबद्ध अंमलबजावणी करणे हीच कोणत्याही संघटनेच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मतही संदीप महाजन यांनी व्यक्त केले. संघटनेची बांधिलकी जपत अधिक प्रभावी उपक्रम आणि प्रकल्प राबवले जातील. प्रत्येक सदस्याने संघटनेची ध्येयधोरणे विद्यापीठातील प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख सल्लागार डॉ. नितीन कावेडे यांनीही यावेळी मार्गदर्शन करत संघटनेच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. संघटनेने प्रशासनाशी सकारात्मक संवाद ठेवत कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
या बैठकीस विद्यापीठातील अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण घाटेकर यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी अनुपमा पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.