
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनियमिततेच्या विरोधात जाहीर केलेल्या मोर्चाची मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने दखल घेतली आहे. सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी प्रस्तावित असलेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ आणि सहसंचालक सावंत यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांची तीव्रता सविस्तरपणे मांडण्यात आली.
मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, मुंबई विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक संदीप सगवे यांच्याविरोधातील चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहेत. या प्रकरणात पारदर्शक आणि नियमानुसार कार्यवाही झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात असून, त्यांचे त्वरित निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले. नियमांचे पालन व्हावे, तसेच ज्या ठिकाणी नियमानुसार प्रक्रिया राबवली गेलेली नाही, तेथे तातडीने सुधारणा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
या चर्चेत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. रविंद्र भदाणे, माजी उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे, मुंबई विभागाचे अध्यक्ष प्रा. श्रीप्रकाश दीक्षित, मुंबई जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. अमर सिंह, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश अहिरे, सचिव प्रा. केशव चौधरी, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. भानुदास बिरादार, सचिव प्रा. शामसुंदर कीर्तने, पालघर जिल्ह्याचे सचिव प्रा. विलास खोपकर, खजिनदार प्रा. मनीवन्नन तसेच उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
या बैठकीत विशेषतः शिक्षकांच्या नियुक्ती मान्यतेचा प्रश्न, वेतन निश्चितीकरणातील विलंब आणि शालार्थ प्रणालीतील अडचणी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बाबींमध्ये कोणताही अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी स्पष्ट केले.
तसेच, शिक्षकांना एका आठवड्याच्या आत शालार्थ आयडी दिले जातील, असे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी ठामपणे सांगितले. येत्या १५ दिवसांच्या आत शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी आणि वेतनपथक अधीक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित शिक्षक समस्यांचे अंतिम निराकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, शिक्षक वर्गात दिलासा व्यक्त केला जात आहे. शिक्षण प्रशासन आणि शिक्षक संघटना यांच्यातील संवाद कायम राहिल्यास समस्या वेळेत सुटतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.