
फोटो सौजन्य - Social Media
६ डिसेंबर १९५६ साली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत माळवली होती. संपूर्ण देशवासियांसाठी तो काळा दिवस होता. पण याच महामानवाने देशाला सोन्याचे दिवस दाखवले. मानवता म्हणजे काय? याचा अर्थ सांगितला. या महामानवाच्या चरणी साष्टांग नमस्कार करत मी माझ्या भीमगर्जनेला सुरुवात करतो:
उपस्थित पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण इथे जमलो आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त! खरं तर, हा दिवस दुःखाचा! पण हाच दिवस त्या मानवाचा आहे ज्या मानवाने भारतातातील मानवांना मानवता शिकवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदर्शी विचारवंत, कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी जातिवाद, सामाजिक अन्याय आणि असमानतेविरुद्ध आपले आयुष्य समर्पित केले. त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी आवाज उठविला, शिक्षणाचा महत्त्व सांगितले आणि समानता, स्वतंत्रता व बंधुत्व या तिन्ही मूल्यांचे बीज रुजवले.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले, परंतु त्यांचा विचार आणि कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी ज्या सामाजिक असमानतेविरुद्ध लढा दिला, त्या विचारांनी आजही आपल्या समाजाला दिशा दिली आहे. त्यांच्या जीवनातील मुख्य संदेश म्हणजे शिक्षण हा बदलाचा पाया आहे. त्यांनी स्वतः शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अडथळे मोडले आणि इतरांना शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त होण्याचा मार्ग दाखविला.
आज आपण या दिवशी डॉ. आंबेडकर यांचे योगदान स्मरतो. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण समाजातील असमानता कमी करण्यासाठी, समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, डॉ. आंबेडकर यांचा संदेश केवळ दलित किंवा मागासवर्गीय समाजापुरता मर्यादित नाही. तो संदेश सर्वसमावेशक समानता, न्याय आणि शिक्षणासाठीचा संदेश आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आजच्या या महाप्रिनिर्वाण दिनी, चला आपण प्रण करुया की आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीस समान हक्क, शिक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी झपाट्याने प्रयत्न करु, आणि डॉ. आंबेडकर यांचा आदर्श आपल्या जीवनात अमलात आणू.
धन्यवाद!