फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबरच्या अहर्ता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी बुधवारी (३ डिसेंबर) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभागीय, जिल्हा, उपविभागीय आणि तहसील कार्यालयांमध्ये ही यादी नागरिकांसाठी पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देत आवश्यक तपशील स्पष्ट केले आहेत.
प्रारूप मतदार याद्यांची तयारी मतदार नोंदणी अधिनियम, १९६० नुसार करण्यात आली असून, संपूर्ण पुनरिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत हस्तलिखिते तयार करणे आणि मतदार याद्यांची छपाई पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी याद्या अधिकृतपणे जाहीर झाल्या. यासोबतच मतदारांना चुका दुरुस्ती अथवा नावांबाबत हरकती मांडण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला आहे. आयोगाच्या नियमानुसार ३ ते १८ डिसेंबर या कालावधीत पात्र शिक्षक मतदारांना आपले दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. संबंधित कार्यालयांमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज दाखल करता येतील. सर्व प्राप्त हरकती व दाव्यांचा निपटारा ५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येईल. त्याच दिवशी पुरवणी यादी तयार करून तिची छपाई केली जाईल. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पात्र अर्ज दाखल झाले असून त्याचा तपशीलही प्रशासनाने जाहीर केला आहे. अमरावती जिल्ह्यात ८१०४, अकोला ४८८३, यवतमाळ ५७१४, वाशिम ३०६०, तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ८०५५ पात्र अर्ज नोंदवले गेले आहेत. एकूण मिळून २९,८१६ अर्जांची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांचा सहभाग लक्षणीय असल्याचे स्पष्ट होते.
अपर आयुक्त जाधव यांनी सांगितले की, शिक्षक मतदारसंघातील प्रत्येक पात्र शिक्षकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद्या शिक्षकाचे नाव यादीत नसल्यास किंवा कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास त्यांनी तात्काळ अर्ज करून दुरुस्ती करावी. शिक्षक हे विधान परिषदेच्या निवडणुकीतील महत्त्वाचे मतदार असून त्यांच्या सहभागामुळे लोकशाही प्रक्रियेला बळ मिळते. त्यामुळे कोणत्याही पात्र शिक्षकाने नाव नोंदणीची संधी दवडू नये, असे आवाहनही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षकांमध्ये नाव तपासण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेकांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन यादी पाहिली आहे. मतदार नोंदणीची अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुयोग्य आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी प्रशासन तयारीत आहे. संपूर्ण विभागात मतदार जागृतीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.






