
फोटो सौजन्य - Social Media
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक १९, हिंदी बालक शाळा क्रमांक ८ तसेच उर्दू मुलांची शाळा क्रमांक ११ येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लहान वयातच लोकशाहीचे महत्त्व समजावे आणि मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीवर आधारित विविध आकर्षक आणि अर्थपूर्ण चित्रे साकारली. “वोट का दान – लोकतंत्र की पहचान”, “फक्त मतदार यादीत नाव नोंदवून थांबू नका, बाहेर पडा आणि मतदान करा”, “मतदान करा – लोकशाही बळकट करा”, “आईबाबांनो, घाई करा, बोटाला शाई लावा”, “मतदान केंद्र”, “चला आजी, आई – पटापट लोकशाही बळकट करूया” अशा घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. या चित्रांच्या माध्यमातून मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क व कर्तव्य असल्याचा संदेश देण्यात आला.
यासोबतच रांगोळी स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी रांगोळ्यांद्वारे मतदान जनजागृतीचा संदेश दिला. मतपेटी, मतदाराचे बोट, शाई, भारताचा नकाशा, लोकशाहीची चिन्हे आदी विषयांवर आधारित रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सर्जनशीलतेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना कलर बॉक्स, कलर स्केचपेन सेट तसेच पेन देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.
या कार्यक्रमाला पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत लहान वयातच मुलांमध्ये मतदानाबाबत जागृती होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक मनोज बोचरे, अशोक बुलबुले यांच्यासह सुवर्णा शिरसाट, आशा गावंडे, भारती परसल्लू, मिनाक्षी भुरे, कमल वानखडे, अफसर खान, सारिका तिवारी आदी शिक्षक-शिक्षिकांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक व समाजातही मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत झाली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.