फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संकुलात ‘माझा देश, मी देशाचा: एक राखी देशासाठी’ हा उपक्रम सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या मनात देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागवणारा एक सशक्त प्रयत्न ठरतो आहे.
या उपक्रमामध्ये संकुलातील सुमारे ४२०० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, त्यांनी देशाच्या सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी स्वतःहून राख्या तयार केल्या आहेत. या राख्या विद्यार्थ्यांनी पूर्ण मनापासून सजवलेल्या असून, त्याद्वारे सैनिकांविषयी आदर, आपुलकी आणि ऋणभाव व्यक्त करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रवेशद्वारावर सकाळी १०.३० वाजता सरस्वती पूजन आणि मातृभूमी पूजनाने होणार आहे. यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूल व सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल येथील आठवी आणि नववीच्या सुमारे ६०० विद्यार्थी विद्यार्थ्यांची देशभक्ती जागवणारी फेरी निघणार आहे. फेरीच्या प्रारंभी इतर विद्यार्थ्यांकडून त्यांना रक्षा सूत्र बांधून सन्मानपूर्वक निरोप देण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता ही फेरी चिपळूण पोस्ट कार्यालयात पोहोचेल. तेथे तालुका व विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते राख्यांची पाकिटे पोस्ट अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली जातील. यावेळी भारताची प्रतिज्ञा व महाराष्ट्र गीत विद्यार्थ्यांकडून सादर केली जाईल, जे वातावरणात देशभक्तीची ऊर्जा निर्माण करेल.
कार्यक्रमानंतर फेरी शाळेकडे परत येईल, जिथे गद्रे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सर्वांचे स्वागत करतील. त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता होईल. याच दिवशी संकुलातील इतर सर्व वर्गांमध्येही रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी सांगितले की, हा उपक्रम प्रतिवर्षी नियमितपणे साजरा व्हावा, आणि शाळेच्या शैक्षणिक संस्कृतीचा भाग व्हावा, हाच आमचा हेतू आहे. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होते, हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे.