फोटो सौजन्य - Social Media
आईपीएस सुमन नाला यांनी केवळ एक यशस्वी अधिकारी म्हणून नव्हे, तर सामाजिक समरसतेचा दीप उजळवणारी नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील आदिवासी भागात गेल्या १२ वर्षांपासून सामाजिक बहिष्कार झेलत असलेल्या २९ कुटुंबांची घरवापसी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे ही घटना केवळ कायद्याची अंमलबजावणी न राहता सामाजिक पुनर्बांधणीचे प्रतीक बनली.
सुमन नाला मूळतः एक तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. त्यांनी २०१२ साली बिट्स पिलानी येथून संगणक विज्ञानात बी.टेक पदवी घेतली आणि पुढे ओरॅकल या बहुराष्ट्रीय कंपनीत तीन वर्षे काम केले. मात्र, त्यांना प्रशासनात येऊन समाजासाठी कार्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. पहिल्यांदा २०१६ मध्ये त्यांनी परीक्षा दिली, परंतु मुख्य परीक्षेत अपयश आले. २०१७ मध्ये त्यांनी इंटरव्ह्यूपर्यंत मजल मारली, पण अंतिम यादीत स्थान मिळाले नाही. २०१८ मध्येही अपयश आले. मात्र, चौथ्या प्रयत्नात २०१९ मध्ये त्यांनी ५०८वी रँक मिळवत यूपीएससी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलिस सेवेत निवड झाली.
सुरुवातीला त्यांचे कॅडर झारखंड होते. मात्र, गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी ओमप्रकाश जाट यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचा बदली गुजरातमध्ये झाली. तेव्हापासून त्या गुजरातमध्ये कार्यरत आहेत. बनासकांठा जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार झेलत असलेल्या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देणे हे एक मोठे आव्हान होते. सुमन नाला यांनी या प्रकरणात केवळ प्रशासकीय हस्तक्षेप केला नाही, तर समाजाच्या विश्वासात जाऊन संवाद साधला. त्यांनी दोन्ही गटांमध्ये सलोखा निर्माण करत १२ वर्षांची तुटलेली नाती पुन्हा जोडली.
त्यांची ही कृती केवळ एक अधिकाऱ्याची कर्तव्यपूर्ती नसून, सामाजिक समतेसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची साक्ष आहे. आयपीएस सुमन नाला आज देशभरातील युवकांसाठी एक आदर्श बनल्या आहेत, ज्यांनी जिद्द, चिकाटी आणि संवेदनशीलतेच्या जोरावर समाजाला एकत्र आणले.