फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एडुकेशन (CBSE)ने देशभरात परीक्षांचे आयोजन केले आहे. १५ फेब्रुवारी २०२५ पासून CBSE बोर्डाच्या दहावी तसेच बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात करण्यात आली आहे. अशामध्ये झारखंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंड राज्यातील रांची येथे एका परीक्षा केंद्रावर तासभर उशिराने परीक्षा सुरु करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील हा एक महत्वाचा टप्पा असतो आणि अशामध्ये होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले होते. परंतु, या प्रकरणी बोर्डाने खबरदारी घेत लवकरात लवकर या संबंधित हालचाली केल्यामुळे समस्या सोडवता आली.
प्रश्नपत्रिकेच्या कमतरतेमुळे परीक्षेला सुरुवात करण्यास विलंब झाला होता. CBSE बोर्डाला ही बातमी कळताच त्यांनी प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या आणि परीक्षेला सुरुवात केली. उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला होता. या परीक्षा केंद्रावर एकूण ५०० विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. अशामध्ये एका अभिवाचकाने या संदर्भात सांगितले आहे की,” परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या कमतरतेमुळे परीक्षा सुरु करण्यास उशीर झाला. एकंदरीत, प्रश्न पत्रिकांचा कमतरतेमुळे हे प्रकरण घडले आहे.”
एका अधीक्षकाने या घटित प्रकरणावर भाष्य करताना सांगितले आहे की, हे प्रकरण कळताच, CBSE ने त्वरित हालचाल करत परीक्षा केंद्रावर आवश्यक प्रशपत्रिका पुरवण्यात आल्या. तसेच, विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला, ज्यामुळे ते शांतचित्ताने आपली परीक्षा पूर्ण करू शकले. तथापि, या संदर्भात स्थानिक परीक्षा केंद्रावरील मुख्याध्यापकांशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क साधण्यात आला नाही, त्यामुळे केंद्रावर प्रत्यक्ष परिस्थिती काय होती, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
CBSE बोर्डाने १५ फेब्रुवारी २०२५पासून देशभरात दहावी तसेच बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. यंदा दहावीच्या परीक्षांसाठी एकूण 24,12,072 विद्यार्थी नोंदणीकृत झाले असून, बारावीच्या परीक्षांसाठी 17,88,165 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विविध परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये याची दक्षता घेतली जात आहे. यंदाच्या परीक्षांसाठी CBSE ने एकूण १२० विषयांसाठी पेपर आयोजित केले असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शांत परीक्षेचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी बोर्डाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.