
फोटो सौजन्य - Social Media
Central Board of Secondary Education ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ९वी ते १२वीचा नवीन अभ्यासक्रम जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली असून, २ एप्रिल रोजी तो अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, यंदा शिक्षण पद्धतीत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, इयत्ता ९वीपासून National Curriculum Framework 2023 च्या शिफारसींची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.
नवीन अभ्यासक्रम जाहीर करण्यासाठी आज दुपारी ३ वाजता द्वारका (दिल्ली) येथील CBSE मुख्यालयात विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. या वेबिनारमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ऑनलाइन सहभागी होऊ शकणार आहेत. यामध्ये नव्या अभ्यासक्रमातील बदल, ‘Scheme of Studies’ आणि अध्यापनाच्या नव्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
यंदाच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल म्हणजे पाठांतरावर आधारित शिक्षणापासून दूर जात संकल्पनात्मक (concept-based) शिक्षणावर भर देण्यात आला आहे. कौशल्याधारित (skill-based) शिक्षण, प्रात्यक्षिक अनुभव (experiential learning) आणि वास्तव जीवनाशी संबंधित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. तसेच विद्यार्थ्यांना विषय निवडीत अधिक लवचिकता (flexibility) देण्यात आली असून, केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे हा उद्देश न राहता सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.
CBSE च्या शैक्षणिक संचालक डॉ. प्रज्ञा एम. सिंग यांनी सर्व शाळांना शिक्षकांना या बदलांची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पालक-शिक्षक बैठका (PTM) आयोजित करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना नवीन अभ्यासक्रम समजावून सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुधारित अभ्यासक्रमाचे काटेकोर पालन करणे सर्व शाळांसाठी आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने इयत्ता ३री ते ८वीसाठीही महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गणित विषयात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती (critical thinking) आणि संगणकीय विचारसरणी (computational thinking) विकसित करण्यावर आधारित आहे. हा कार्यक्रम पुढील वर्षी ९वी आणि १०वीपर्यंत विस्तारण्याचा मानस आहे.
या बदलांमुळे देशातील शिक्षण प्रणाली अधिक आधुनिक, कौशल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.