
फोटो सौजन्य - Social Media
एमएमएस आणि एमसीए हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता असून विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरतात. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून यूजीसी आणि एआयसीटीईने सीडीओईमार्फत एमएमएस अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष असून विद्यार्थ्यांना मानव संसाधन (एचआर), वित्त (फायनान्स) आणि विपणन (मार्केटिंग) या तीन विशेष शाखांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे.
याशिवाय, एमसीए हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम असून संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो उपयुक्त मानला जातो. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणासह अद्ययावत ज्ञान आणि कौशल्ये मिळण्यास मदत होते. विहित मुदतीत अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीडीओईच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे पाहाव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे.