फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Sripati Civil Judge: कोणत्याही महिलेसाठी आई होणे हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो, परंतु तामिळनाडूच्या श्रीपतीने या काळात घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने तिची देशभरात ओळख निर्माण केली. मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी तिने २०० किलोमीटरचा प्रवास करून सिव्हिल जजची परीक्षा दिली आणि वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ‘सिव्हिल जज’ बनून इतिहास रचला. ती तामिळनाडूच्या ‘मलैयाली आदिवासी’ समुदायातील पहिली महिला सिव्हिल जज ठरली आहे.
श्रीपतीचा जन्म तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील धनियाक्कुप्पम या दुर्गम गावात झाला. राखीव वनक्षेत्रात असलेल्या या गावात आजही पक्क्या रस्त्यांचा अभाव असून सर्वात जवळचे बसस्थानक १५ किमी दूर आहे. तिचे वडील मजुरी आणि शेती करायचे, तर आई गृहिणी होती. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही माता-पित्यांनी मुलांच्या शिक्षणाशी तडजोड केली नाही. लहानपणापासूनच आपल्या आदिवासी समाजाला कायदेशीर ज्ञानाअभावी त्रस्त होताना पाहून श्रीपतीने कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले होते.
शालेय शिक्षणानंतर श्रीपतीने एलएलबी (LLB) पूर्ण केले. तिचे लग्न अगदी कमी वयात झाले आणि तिचे पती ट्रक ड्रायव्हर आहेत. ग्रामीण भागात लग्नानंतर मुलींचे शिक्षण थांबते, परंतु पती आणि सासरच्या खंबीर पाठिंब्यामुळे श्रीपतीने ‘तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या’ (TNPSC) परीक्षेची तयारी सुरूच ठेवली.
नोव्हेंबर २०२३ मध्ये श्रीपतीने मुलीला जन्म दिला. बाळंतपणानंतर जेथे महिला विश्रांती घेतात, तेथे परीक्षा जवळ आल्यामुळे श्रीपतीने नवजात बाळाला कुटुंबाकडे सोडले आणि पतीसोबत २०० किमीचा प्रवास करून परीक्षा केंद्र गाठले. तिची मेहनत फळाला आली आणि ती न्यायाधीश बनली. तिच्या या यशाबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही तिचे कौतुक केले. गरिबी, दुर्गम भाग आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर मात करत मिळवलेले तिचे हे यश आज लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.






