फोटो सौजन्य - Social Media
आयुष्यात मोठे बनण्यासाठी शिक्षण महत्वाचेच आहे. परंतु, असे काही क्षेत्र आहेत, जेथे पैसे कमवण्यासाठी डिग्रीची काहीच आवश्यकता नाही आहे. तुमच्या अंगी कौशल्य असेल आणि काहीतरी करण्याची धमक असेल तर तुम्ही बिनधास्त या क्षेत्रांमध्ये उतरू शकता आणि आपले करिअर घडवू शकता. आजच्या युगात केवळ पदवी घेतल्याशिवायही अनेक क्षेत्रांमध्ये उज्ज्वल करिअर घडवता येते. जर तुमच्यात कौशल्य, जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर खालील क्षेत्रांमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. एअर होस्टेस होण्यासाठी विशिष्ट पदवी आवश्यक नसते. उत्तम कम्युनिकेशन कौशल्य, नीटनेटकेपणा आणि प्रवाशांशी चांगले वर्तन करण्याची क्षमता असल्यास, तुम्ही या क्षेत्रात यश मिळवू शकता. विविध विमान कंपन्या ट्रेनिंगसह नोकरीच्या संधी देतात. अनेक मुली बारावीचे शिक्षण घेऊन एअर होस्टेस संबंधित उपल्बध असणारे कोर्स करतात आणि या क्षेत्रात पाऊल ठेवतात.
जर तुमच्याकडे उत्तम गाण्याची कला असेल आणि तुमचा आवाज मोहक असेल, तर गायक म्हणून करिअर करू शकता. तुम्ही म्युझिक अल्बम, लाइव्ह शो, तसेच सोशल मीडियाच्या मदतीने तुमचा आवाज जगभर पोहोचवू शकता. आताच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणे फार कठीण नाही, तर तुम्ही सोशल मीडियावर आपली छाप पडू शकता.
मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी कोणतीही पदवी लागतेच असे नाही. योग्य कौशल्य आणि सौंदर्यप्रसाधनांची माहिती असेल, तर तुम्ही वेडिंग, फॅशन आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी संधी मिळवू शकता. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला या संबंधित उपल्बध असणारे कोर्सेस करावे लागतील. नृत्य हा एक कला प्रकार असून त्यात करिअर करण्यासाठी पदवीपेक्षा तुमच्या कौशल्याला महत्त्व दिले जाते. तुम्ही नृत्य प्रशिक्षण घेऊन कोरिओग्राफर, डान्स टीचर किंवा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लोकप्रिय होऊ शकता.
ब्लॉगिंग हे सध्या प्रचंड लोकप्रिय क्षेत्र आहे. तुमच्या आवडीच्या विषयावर लेखन करून तुम्ही ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवू शकता. योग्य प्रमोशन आणि दर्जेदार कंटेंटने तुम्ही चांगली कमाई करू शकता. लिखाणाची आवड असणाऱ्या लोकांसाठी Blogging एक उत्तम पर्याय आहे. फोटोग्राफी हे एक कौशल्याधारित क्षेत्र आहे. वेडिंग, फॅशन, वाइल्डलाइफ किंवा इव्हेंट फोटोग्राफीसाठी मोठी मागणी आहे. सोशल मीडियाद्वारे किंवा ऑनलाइन फोटो विक्री करून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता.
योग्य फिटनेस ज्ञान आणि ट्रेनिंग कौशल्य असेल तर तुम्ही जिम ट्रेनर, योगा ट्रेनर किंवा वैयक्तिक फिटनेस कोच म्हणून चांगली संधी मिळवू शकता. जर तुम्हाला सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची कला अवगत असेल आणि लोकांना प्रभावित करण्याची क्षमता असेल, तर तुम्ही इन्फ्लुएंसर म्हणून ब्रँड प्रमोशनद्वारे चांगली कमाई करू शकता. हे सर्व क्षेत्र असे आहेत जिथे पदवी नसली तरी तुमच्या कौशल्यावर आधारित यश मिळू शकते. मेहनत, चिकाटी आणि योग्य नियोजन यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता.