फोटो सौजन्य - Social Media
आपल्याला परीक्षेत मिळालेले गुण आपले आयुष्य ठरवत नाहीत. कमी गुण मिळाले म्हणून आपले आयुष्य संपत नाही. कमी गुण मिळाले म्हणून हताश होऊ नका नव्या ऊर्जेने उभा राहा आणि नवीन दिशा शोधण्यास सुरु करा. दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागात अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेले आयपीएस दिनेश कुमार गुप्ता यांची कथा याच गोष्टीची साक्ष देते. बारावीत त्यांना केवळ 58% गुण मिळाले होते, त्यामुळे त्यांना वाटले की आता पुढे काय करायचे? पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बीएससी पूर्ण केली, त्यानंतर एमबीए केले आणि शेवटी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आयपीएस अधिकारी बनले.
सध्या शाळांमध्ये परीक्षा संपत आल्या असून निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या निकालांची प्रतीक्षा असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना याची चिंता सतावू लागली आहे. विशेषतः कमी गुण मिळाल्यास भविष्यात काय करायचे, या विचाराने विद्यार्थी घाबरतात. दिनेश कुमार गुप्ता सांगतात की, बारावीत आजारी असल्यामुळे त्यांचे गुण कमी आले. त्यामुळे ते डॉक्टर किंवा अभियंता होऊ शकणार नाहीत, असे त्यांना वाटू लागले. समाज काय म्हणेल, या विचारानेही ते चिंतेत होते. मात्र त्यांनी परिस्थितीशी लढण्याचे ठरवले. ते म्हणतात, “गुणांपुढे हार मानू नका. थोडा वेळ निराश वाटू शकते, पण पुन्हा उभे राहून नवीन दिशा शोधा. जीवनात कोसळल्यावर पुन्हा उभे राहता आले पाहिजे. मला स्वतःला सिद्ध करायचे होते आणि मी ते केले.”
सीबीएसईच्या काउंसिलिंग प्रोग्रामच्या माजी प्रोजेक्ट प्रमुख रमा शर्मा म्हणतात की, “निकाल हा केवळ एक टप्पा आहे, तो शेवट नाही. तीन तासांच्या परीक्षेवरून विद्यार्थ्यांची खरी क्षमता मोजता येत नाही. त्यामुळे गुणांच्या आधारे स्वतःची तुलना करू नका किंवा निराश होऊ नका.” परीक्षा म्हणजे आपल्यातील उणीवा शोधण्याचा एक मार्ग आहे. पालकांनीही मुलांची तुलना दुसऱ्यांशी करू नये. कमी गुण आले तरीही सर्वप्रथम शिक्षक आणि पालकांशी बोलावे. आत्मविश्वास गमावू नका, कारण आज करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. निकालानंतर आपल्या आवडीचा विचार करून योग्य क्षेत्र निवडावे.