
फोटो सौजन्य - Social Media
मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भाषा संचालनालयामार्फत १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यांतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘बोलींचा जागर’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘बोलींचा जागर’ या उपक्रमाअंतर्गत बोलीभाषा नष्ट होण्यामागील कारणांचा अभ्यास करणे, त्यावर उपाययोजना सुचवणे, तसेच विविध उपक्रम, कार्यक्रम आणि संकलनाच्या माध्यमातून बोलीभाषांचे जतन करणे, या अनुषंगाने काम केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे कलिना येथील जे. पी. नाईक सभागृहात सोमवारी नियोजन बैठक पार पडली. ही बैठक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्यासह विविध बोली अभ्यासक, भाषा तज्ज्ञ आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ बोली अभ्यासक डॉ. प्रतिभा काणेकर यांनी पालघर जिल्ह्यातील सहा बोलींच्या समाज-भाषावैज्ञानिक अभ्यासाविषयी माहिती दिली. या अभ्यासातून ‘बोलक’ हा शब्द रूढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. बोलींचा शब्दसंग्रह संकलित करणे, बोलीची व्याकरण रचना तपासणे, बोलकांचे प्रदेश, व्यवसाय, जाती आणि त्यांचा बोलीशी असलेला संबंध अभ्यासणे, तसेच बोलकांच्या भाषिक वर्तनाचा अभ्यास करणे, या पद्धतीने संशोधन करण्यात आले. या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमधील आपल्या बोलीविषयीचा न्यूनगंड कमी झाला असून, ते एकेका बोलीच्या सूक्ष्म अभ्यासाकडे वळले आहेत. या प्रक्रियेतून बोलकांची सामाजिक व सांस्कृतिक रचना अधिक स्पष्टपणे समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांनी लुप्तप्राय होत असलेल्या बोलींचे जतन व संवर्धन करताना त्या केवळ संग्रहित न ठेवता नवतंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम विद्यापीठ स्तर, बोली अभ्यासकांच्या कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्र अशा तीन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील बोलींचा अभ्यास एम.फिल., पीएच.डी. संशोधन तसेच विशेष संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या संशोधनाचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण होणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ संशोधक आणि माजी मराठी विभागप्रमुख डॉ. पुष्पलता राजापुरे यांनी मांडले.
एकूणच ‘बोलींचा जागर’ या उपक्रमाच्या माध्यमातून मराठीतील विविध बोलीभाषांना नवसंजीवनी देण्यासोबतच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.