
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘राष्ट्रप्रेम अभियान’ अंतर्गत राज्यातील २१ हजारांहून अधिक शाळांमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि देशभक्तीची भावना वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी राज्यभरातील सुमारे १० हजार माजी सैनिक, एनसीसी तसेच स्काऊट-गाईड कॅडेट्स यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लष्करी शिस्त, संचलन, कवायत तसेच देशरक्षणाचे मूलभूत धडे दिले जाणार आहेत. हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने राबवले जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अमरावती शहरातील विविध शाळांमधील तब्बल २ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत आणि संचलनाचे भव्य सादरीकरण केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि एकात्मतेचे दर्शन घडले. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान देखील राबविण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक शाळेत कॉपीमुक्तीची शपथ घेण्यात आली. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि शैक्षणिक शिस्त रुजवणे हा असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात जनजागृती होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत आणि संचलन आयोजित करण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही २६ जानेवारी रोजी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा उपक्रम राज्यभरातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून शाळांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
दादा भुसे यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभागाकडून राबविले जाणारे सर्व धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम हे पूर्णतः विद्यार्थी-केंद्रित आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायन, शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळाभेटी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शासकीय शाळांमधील विविध समित्यांचे सुलभीकरण अशा अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय माजी विद्यार्थी संघांची स्थापना, ‘आयडॉल शिक्षक’ आणि ‘आयडॉल शाळा’ उपक्रम, शाळा व संस्था बँक निर्मिती तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांमुळे शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.