फोटो सौजन्य - Social Media
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मीरा-भाईंदर शहराला एक मोठी आणि अभिमानास्पद भेट मिळाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १८० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन” या भव्य सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर रोजी सर्वांसाठी खुले करण्याची घोषणा केली आहे. हे कलादालन मीरा-भाईंदरसाठी नव्या सांस्कृतिक युगाची सुरुवात ठरणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मंत्री सरनाईक यांनी विशेष भेट दिली आहे. १८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना किड्स झोनमध्ये मोफत प्रवेश मिळणार असून, या झोनमध्ये एआय (Artificial Intelligence) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम सादर केले जातील. शिक्षण आणि मनोरंजनाचा संगम साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या प्रवेशासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असेल. या भव्य कलादालनात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित होलोग्राम सादरीकरण, शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास उलगडणारे मल्टिमिडीया प्रदर्शन, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरण अनुभवता येईल.
याशिवाय कलादालनातमल्टिमिडीया / ऑडिओ-व्हिज्युअल प्रदर्शन, ई-लायब्ररी आणि संगीत केंद्र, “स्टडी झोन” — UPSC, MPSC, IPS, IES सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अभ्यास केंद्र, “सीनियर सिटिझन झोन” — जुन्या गाण्यांचा संग्रह आणि शांत वातावरण, अॅम्फीथिएटर, संग्रहालय, कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, लँडस्केप गार्डन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि रिसायकलिंग प्लांट यांसारख्या पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध असतील.
मंत्री सरनाईक म्हणाले, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारलेलं हे महाराष्ट्रातील पहिलंच कलादालन आहे आणि ते मीरा-भाईंदरमध्ये सुरू होत असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. कला, संस्कृती आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला चालना देणारं हे केंद्र म्हणजे शहराच्या विकासातील नवा अध्याय आहे. आता मीरा-भाईंदरकरांना कलेचा आनंद घेण्यासाठी मुंबईत जाण्याची गरज नाही. दिवाळीच्या निमित्ताने ही माझ्याकडून शहरवासीयांना खास भेट आहे.”
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन” हे केवळ एक प्रदर्शनगृह नसून, कला, संस्कृती, तंत्रज्ञान आणि नव्या विचारांचा संगम आहे. या केंद्रामुळे मीरा-भाईंदर शहराची ओळख राज्यभर नव्या रूपात झळाळून उठेल, असं म्हटलं जातं.