
career guide
Complete Career Guide for Freshers : कॉलेजचा शेवटचे वर्ष संपताच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो—आता पुढे काय? हातात ग्रॅज्युएशनची डिग्री आलेली असते, घरच्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि मित्रांमध्ये नोकरी लागण्याची चर्चा सुरू होते. या टप्प्यात अभ्यासाची दुनिया मागे सुटते आणि करिअरची खरी शर्यत सुरू होते. परंतु, योग्य दिशा आणि माहिती नसल्यामुळे अनेक तरुण सुरुवातीला गोंधळून जातात आणि आठवडे-महिने फक्त जॉब पोर्टल तपासत राहतात.
जॉब मार्केट आता वेगाने बदलले आहे. आता फक्त कॉलेजची डिग्री असणे म्हणजे नोकरीची हमी नाही. कंपन्या अशा फ्रेशर्सना प्राधान्य देतात ज्यांच्याकडे प्रात्यक्षिक ज्ञान, योग्य स्किल्स आणि आत्मविश्वास असतो. जर तुम्ही कॉलेजमधून पास आउट झाला असाल किंवा अंतिम वर्षात असाल आणि चांगल्या जॉबच्या शोधात असाल, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. योग्य रणनीती आणि स्मार्ट दृष्टिकोनाने सुरुवात करून तुम्ही लवकरच तुमच्या करिअरची पहिली पायरी गाठू शकता. ही करिअर गाईड सेव्ह करून ठेवा.
बहुतेक विद्यार्थी ग्रॅजुएशन पूर्ण होताच इंटर्नशिप किंवा नोकरी शोधू लागतात. त्यानंतर काहीजण जॉबसोबतच मास्टर्सची डिग्री करतात, तर काहीजण १-२ वर्षे जॉब केल्यानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवतात. ग्रॅजुएशननंतर लगेच नोकरी कशी शोधायची, हे आता आपण जाणून घेऊया.
कॉलेजमध्ये तुम्ही जे शिकलात ती थ्योरी होती, पण ऑफिसमधील काम प्रॅक्टिकल असते. तुमच्या क्षेत्राशी संबंधित नवीन स्किल्स शिका. उदाहरणार्थ- डिजिटल मार्केटिंग, डेटा एन्ट्री, एमएस ऑफिस/एक्सल, बेसिक कोडिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट. याशिवाय, तुमच्या कम्युनिकेशन्स स्किल्सवर आणि इंग्रजीत बोलण्याच्या भीतीवर काम करा.
कोणत्याही व्यक्तीचा रेझ्युमे ही कंपन्यांमधील त्याची पहिली ओळख असते. हा रेझ्युमे खूप मोठा नसावा, १ पानाचा स्वच्छ आणि नीटनेटका फॉर्मेट असणारा असावा. यामध्ये कॉलेज प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, सेमिनार आणि तुम्हाला येणाऱ्या स्किल्स ठळकपणे लिहा. रेझ्युमेमध्ये स्पेलिंग किंवा ग्रामरची कोणतीही चूक असणार नाही, याची विशेष काळजी घ्या.
ग्रॅजुएशननंतर लगेच फुल-टाइम जॉब मिळाला नाही, तर इंटर्नशिप करण्यास अजिबात संकोच करू नका. ३ किंवा ६ महिन्यांच्या इंटर्नशिपमुळे कॉर्पोरेट लाईफचा चांगला अनुभव मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक कंपन्या उत्तम काम पाहिल्यानंतर इंटर्नलाच फुल-टाइम जॉब ऑफर करतात. इंटर्नशिप संपल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र घेणे विसरू नका. अनेक कंपन्या इंटर्नला स्टायपेंड सुद्धा देतात.
सध्याच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी लिंक्डइन हे सर्वात पॉवरफुल टूल आहे. त्यावर तुमचे प्रोफाईल प्रोफेशनल पद्धतीने सजवा. ज्या क्षेत्रात जॉब हवा आहे, त्या इंडस्ट्रीच्या एचआर आणि वरिष्ठ लोकांशी कनेक्ट व्हा. Naukri.com, Indeed आणि Internshala यांसारख्या जॉब पोर्टल्सवर आपले प्रोफाईल अपडेट ठेवा.
तुमच्या कॉलेजचे सीनियर, मित्र, प्राध्यापक आणि नातेवाईकांना सांगा की तुम्ही जॉब शोधत आहात. यात संकोच करण्याची गरज नाही. अनेकदा रेफरलकडून लवकर इंटरव्ह्यू कॉल येतो. काही कंपन्यांमध्ये तर फक्त रेफरलच्या आधारावरच नोकरी मिळते. यासोबतच बेसिक इंटरव्ह्यू प्रश्नांचा (उदा. Tell me about yourself, strengths, weakness) सराव नक्की करा.