फोटो सौजन्य - Social Media
भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि आदर्श शिक्षणपद्धती म्हणजे गुरुकुल प्रणाली. ही पद्धत केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी होती. ‘गुरु’ आणि ‘कुल’ या दोन शब्दांपासून ‘गुरुकुल’ हा शब्द बनलेला आहे म्हणजे गुरुच्या आश्रमात राहून शिक्षण घेण्याची व्यवस्था. येथे विद्यार्थी केवळ शास्त्र, वेद, गणित किंवा युद्धकला शिकत नसत, तर त्यांना शिस्त, विनम्रता, आत्मसंयम, कर्तव्यबुद्धी आणि समाजसेवेचे मूल्य शिकवले जात असे.
गुरुकुलामध्ये शिक्षण पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात दिले जाई. विद्यार्थी जंगलातील आश्रमात राहत आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत. त्या काळात कोणतेही शाळा-कॉलेज नव्हते; गुरुंचे आश्रमच शिक्षणसंस्था मानल्या जात. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी समाजातील कोणत्याही वर्गातून येऊ शकत. राजा असो वा शेतकऱ्याचा मुलगा सर्व विद्यार्थी समान पद्धतीने शिकत आणि गुरुंच्या आज्ञांचे पालन करत. ही प्रणाली समतेचा, साधेपणाचा आणि आत्मनिर्भरतेचा उत्कृष्ट नमुना होती.
गुरुकुलातील शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे शिकवले जात जसे की अन्न शिजवणे, शेती करणे, प्राण्यांची सेवा करणे, तसेच आत्मसंयम आणि ध्यान करण्याचे प्रशिक्षण दिले जाई. शिक्षण हे गुरू-शिष्य नात्याच्या भावनिक नात्यावर आधारलेले होते. गुरूंच्या सेवेत राहून विद्यार्थी त्यांच्या कृतीतून शिकत आणि त्यांच्या वर्तनातून जीवनमूल्य आत्मसात करत.
कालांतराने गुरुकुल पद्धतीवर परकीय आक्रमण, औपनिवेशिक शिक्षण आणि आधुनिक शालेय प्रणालींचा प्रभाव पडून ती हळूहळू नष्ट झाली. तरीही आजच्या काळातही तिचे महत्त्व कमी झालेले नाही. आज अनेक शैक्षणिक संस्था गुरुकुल पद्धतीतील मूल्यांवर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक संस्कार यांचा समन्वय साधत, पुन्हा एकदा भारतीय शिक्षणातील आत्मा पुनर्जिवित करण्याचे कार्य सुरू आहे.
गुरुकुल प्रणाली ही फक्त शिक्षणपद्धती नव्हती ती जीवनशैली, संस्कारसंस्था आणि मानवी मूल्यांची शाळा होती. म्हणूनच ती आजही भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचा सर्वात सुंदर वारसा मानली जाते.