फोटो सौजन्य - Social Media
‘महाराष्ट्रातील संगीत वाद्ये’ या विषयावर आधारित ‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक, लोकसंगीताशी निगडित तसेच शास्त्रीय परंपरेतील एकूण ११० वाद्यांची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ७५ वाद्यांचे प्रदर्शन आणि सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होताना मंत्री शेलार म्हणाले, “‘वाद्यमंथन’ या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील विविध वाद्यांना नवी ओळख मिळेल आणि पारंपरिक कलांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.”
या ई-पुस्तकात प्रत्येक वाद्याची ओळख, त्याचा उपयोग, रचना, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि कोणत्या प्रसंगी वाजवले जाते याची माहिती सविस्तर दिली आहे. त्या लोकवाद्यांमध्ये टिमकी, टिंगरी, डेरा, हिरोबाई किंगरी, डकलवार किंगरी, बिगुल, भेर, किल्लेतोंडा, तारपा, पागई, घाटोळी, घांगळी, चोंगा, मंदल, मंदारी, पिरी, ढाक, डहाका, सुरसोटा, गादली, शिंग पेपा, तुरंबा, धुम्मस, डवर, पावरी, दिमडी, गुडगुडी, घुमट, करताल, टप्पा, चिटकुरी, घाटी, खैताळ, रेला, टिंगरी, तिबुली, डोना, घोळकाठी, तटकली, मादळ, गुबूगुबू ढोल, खालुबाजा, कहाळे, तुंबडी अशा वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा समावेश आहे. संबळ, सनई, चौघडा, सुंदरी, वेगवेगळ्या प्रकारचे ढोल, भोंगा, पिपाणी, पायपेटी, पखावज, हलगी ताशा, चोंडके, ढिंगी, सारंगी, तुणतुने, तुर अशाही वाद्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल होते, तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेलार यांनी यावेळी सांगितले की, “महाराष्ट्राची कला आणि संस्कृती अत्यंत समृद्ध आहे. यातील अनेक दुर्लभ घटकांचे दस्तऐवजीकरण आवश्यक आहे. ‘वाद्यमंथन’ हे त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.” विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठी हे ई-पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.