
फोटो सौजन्य - Social Media
यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक उमेदवार वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करूनही अपयशामुळे खचून जातात. मात्र काही जण अपयशालाच आपली ताकद बनवतात. हरयाणातील देवयानी यादव यांची यशोगाथा अशीच प्रेरणादायी आहे. सलग अपयशांचा सामना करून अखेर २०२१ मध्ये अखिल भारतीय ११ वा क्रमांक मिळवत त्या आयएएस अधिकारी बनल्या. हरयाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या देवयानी यादव यांचे शालेय शिक्षण चंदीगडमधील एका वरिष्ठ माध्यमिक शाळेत झाले. अभ्यासात हुशार असलेल्या देवयानी यांनी २०१४ साली बिट्स पिलानी, गोवा कॅम्पस येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. त्यांचे वडील विनय सिंह हे हिसार येथील विभागीय आयुक्त आहेत. लहानपणापासून वडिलांना प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना पाहिल्यामुळे देवयानी यांच्या मनातही आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न रुजले.
मात्र त्यांचा यूपीएससीचा प्रवास सोपा नव्हता. २०१५, २०१६ आणि २०१७ या सलग तीन वर्षांत त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली, परंतु प्राथमिक परीक्षाही त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. अनेक उमेदवार अशा टप्प्यावर हार मानतात, पण देवयानी यांनी अपयश स्वीकारून स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि थेट मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र अंतिम यादीत त्यांचे नाव आले नाही.
तरीही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. २०१९ मध्ये घेतलेल्या चौथ्या प्रयत्नात देवयानी यांनी यूपीएससी परीक्षेत २२२ वा क्रमांक मिळवला. या रँकच्या आधारे त्यांची केंद्रीय लेखापरीक्षण विभागात (CAG) निवड झाली आणि त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. मात्र इतक्यावर न थांबता, त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर देवयानी यांनी २०२१ मध्ये मोठी झेप घेतली. त्या वर्षी त्यांनी अखिल भारतीय स्तरावर ११ वा क्रमांक पटकावला आणि अखेर आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
देवयानी यादव यांचा यशाचा मंत्र अत्यंत साधा पण प्रभावी आहे. त्या सांगतात की, यूपीएससीची तयारी करताना सर्वप्रथम अभ्यासक्रमाचे सखोल आकलन आवश्यक आहे. अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करावी. वाचन करताना स्वतःच्या शब्दांत संक्षिप्त नोट्स तयार करणे महत्त्वाचे असून वेळोवेळी त्या सुधारत अनावश्यक मुद्दे वगळावेत. चालू घडामोडींसाठी दररोज वर्तमानपत्र वाचन आवश्यक असल्याचे त्या सांगतात. तसेच, मुलाखतीसाठी मॉक इंटरव्ह्यू देणे आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. अपयश कितीही वेळा आले तरी ध्येयावर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते, हेच आयएएस देवयानी यादव यांच्या प्रवासातून स्पष्ट होते. त्यांची कहाणी आज लाखो यूपीएससी इच्छुकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.