फोटो सौजन्य - Social Media
भारतातील सर्वात प्रतिष्ठित व कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे UPSC (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) परीक्षा. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी बहुतांश उमेदवार आपली नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यास करतात. मात्र काही जण अशाही असतात जे काम, जबाबदाऱ्या आणि अनेक अडथळ्यांमध्येही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत राहतात. श्वेता भारती हिचं आयुष्य हे अशाच कठीण प्रवासाचं आणि अपार जिद्दीचं उदाहरण आहे.
श्वेता बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या श्वेताने पटना येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि भागलपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. शिक्षणानंतर तिला नामवंत IT कंपनी विप्रो मध्ये नोकरी मिळाली. पण तिच्या मनात एक वेगळं स्वप्न होतं, देशसेवा करण्याचं, IAS अधिकारी होण्याचं.
तिनं जेव्हा UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्यासमोर अनेक अडचणी होत्या. दिवसभराची ९ तासांची नोकरी, त्यात कार्यालयातला मानसिक ताण, प्रवासाचा थकवा, आणि घरी आल्यावर कुटुंबाची जबाबदारी अशा सर्व गोष्टी असूनही UPSCसाठी वेळ काढणं हे तसं अवघडच. मात्र श्वेताची चिकाटी आणि ध्येयावरचा विश्वास या गोष्टींनी तिला थांबू दिलं नाही.
तिनं ठरवलं की नोकरीही सांभाळायची आणि स्वप्नासाठी मेहनतही घ्यायची. म्हणून तिनं कामानंतरच्या वेळेत पूर्णतः अभ्यासाला वाहून घेतलं. सोशल मीडियासारख्या गोष्टींपासून दूर राहून, वेळेचं काटेकोर नियोजन करून ती दररोज अभ्यास करत राहिली. अनेकदा रात्री उशिरापर्यंत तिनं अभ्यास केला. या प्रवासात तिला थकवा आला, संधी कमी वाटल्या, पण ती खचली नाही.
या मेहनतीचं पहिलं फळ तिला BPSC (बिहार लोकसेवा आयोग) परीक्षेत मिळालं. तिनं या परीक्षेत यश मिळवत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर म्हणून निवड मिळवली. पण श्वेताचं स्वप्न त्याहून मोठं होतं, IAS बनण्याचं. म्हणून तिनं पुन्हा UPSCची तयारी सुरुच ठेवली. अखेर तिच्या मेहनतीचं सार्थ फळ तिला 2021 मध्ये मिळालं, जेव्हा UPSC परीक्षेत 356वी रँक मिळवत ती IAS अधिकारी बनली. आज ती बिहारमधील भागलपूर येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि लोकसेवेसाठी आपलं कर्तव्य निभावत आहे.