फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलाने SSR (Senior Secondary Recruit) आणि MR (Matric Recruit) पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना 21 मार्च 2025 रोजी जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण (Gen) / OBC / EWS प्रवर्गासाठी ₹550 + 18% GST, तर SC / ST / PWD प्रवर्गासाठी ₹550 + 18% GST आहे. शुल्क भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे. परीक्षेसंबंधी बोलायचे झाल्यास, भरतीसाठी लेखी परीक्षा मे 2025 मध्ये आयोजित केली जाईल.
उमेदवाराचे वय 17.5 ते 23 वर्षे दरम्यान असावे. वयोमर्यादेची गणना 1 जानेवारी 2025 नुसार केली जाईल. तसेच, शासकीय नियमानुसार काही प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. निवड प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर संगणक आधारित लेखी परीक्षा होईल. यशस्वी उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलावले जाईल. यामध्ये ठरावीक शारीरिक पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून त्यातील पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाच्या अटींची तपासणी करावी. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाइन अर्ज फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक आणि योग्य प्रकारे भरावी. अर्जात कोणतीही चूक झाल्यास तो बाद होऊ शकतो, त्यामुळे माहिती भरताना विशेष काळजी घ्यावी.
त्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक दस्तऐवज योग्य स्वरूपात अपलोड करावेत. दस्तऐवज अपलोड करताना त्यांचा स्पष्टपणे वाचता येईल याची खात्री करावी. त्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे. शुल्क भरण्यासाठी Credit Card, Debit Card, UPI किंवा Net Banking चा वापर करता येईल.
शेवटी, संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा नीट तपासून योग्य ती माहिती भरली आहे याची खात्री करून तो सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून ठेवावी. भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आणि अद्यतन वेळोवेळी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी [joinindiannavy.gov.in](https://joinindiannavy.gov.in) या वेबसाइटला भेट द्यावी.