फोटो सौजन्य- प्रतिनिधी
अंबरनाथ शहरात इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. शनिवारी अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अंबरनाथ तालुक्यातील जवळपास २५ पेक्षा जास्त शहरी आणि ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर नाविन्यपूर्ण असे विज्ञान प्रयोग प्रक्लप बनविले होते.
तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित विज्ञान प्रयोग प्रकल्प केले सादर
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळावा यासाठी इनर्व्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यंदा हे या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गट आणि इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा गट अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रयोग सादर केले. यामध्ये स्वसंरक्षण, सुरक्षा यंत्रणा, रडारची कार्यप्रणाली, सौरऊर्जा आधारित उपकरणे व कार्यप्रणाली, पौष्टिक आहार, रेल्वे सेवा, हवाई वाहतुक, शहरी नगररचना, परंपरा वाहतूक व्यवस्था, जीवनशैली, मैदानी खेळ, सोशल मीडिया, योगासने अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वयंचलित आणि चित्र स्वरूपात प्रयोग सादर केले.विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा केलेला वापर त्याला दिलेली विज्ञानाची जोड यामुळे या प्रदर्शनामध्ये सादर केलेले प्रयोग प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ विजय निंबाळकर यांची उपस्थिती
प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून एनएमआरएल (Naval Materials Research Laboratory) शास्त्रज्ञ डॉ विजय निंबाळकर हे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन प्रयोगाद्वारे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील वितरित करण्यात आले. यावेळी अध्यक्षा रेवती वॉरियर, सचिव रचना दलाल, डॉ. रेवती जठार, प्रिता बिपीन, निशा पांडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.