फोटो सौजन्य - Social Media
“लाटांपासून घाबरून कधीच नौका पार होत नाही, प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही.” बालपणापासून ऐकलेली ही ओळ आजही अनेकांच्या जीवनात प्रेरणा ठरते. अशीच प्रेरणादायी कथा आहे IAS अधिकारी मुद्रा गैरोला यांची! त्यांच्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीमुळे त्यांनी ना केवळ स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं, तर वडिलांचं ५० वर्षांपूर्वीचं स्वप्न देखील साकार केलं.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील रहिवासी असलेल्या मुद्रा गैरोला यांचं बालपण मध्यमवर्गीय घरात गेलं. त्या अभ्यासात फार हुशार होत्या. सध्या त्यांचं कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक आहे. मुद्राने दहावीत ९६% आणि बारावीत ९७% गुण मिळवले. त्यानंतर तिने मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयातून बीडीएस (डेंटल) शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये गोल्ड मेडल सुद्धा पटकावलं. पण त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की मुद्रा आयएएस अधिकारी व्हावी. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राने एमडीएस शिक्षण अर्धवट सोडून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
साल 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली, यात ती इंटरव्ह्यू राऊंड पर्यंत पोहोचली. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा प्रयत्न केला, परंतु निवड होऊ शकली नाही. 2020 मध्ये तर मुख्य परीक्षाही पार करता आली नाही. पण हार न मानता, 2021 मध्ये तिने पुन्हा एकदा UPSC परीक्षा दिली आणि यावेळी 165वी रँक मिळवत IPS अधिकारी बनली. मात्र तिला IAS व्हायचंच होतं. म्हणून 2022 मध्ये तिने पुन्हा प्रयत्न केला आणि 53वी रँक मिळवत IAS पदावर यशस्वीपणे निवड झाली.
मुद्राची ही यशोगाथा सिद्ध करते की, अपयश कितीही वेळा येऊ दे, जर प्रयत्न प्रामाणिक असतील, तर यश अटळ आहे. तिच्या संघर्षाने आणि समर्पणाने आज अनेक तरुणांना आणि विशेषतः महिलांना प्रेरणा मिळत आहे. पितृस्वप्न साकार करणारी ही कन्या आज अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.