
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई विद्यापीठाने यापूर्वीही NEP संदर्भात अनेक कार्यशाळा आणि चर्चासत्रे घेतली आहेत. त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला असला तरी धोरण राबविताना अनेक मुद्दे अद्याप अनुत्तरीत राहिले आहेत. शिक्षकांवर वाढलेले कामाचे ओझे, विद्यार्थ्यांची जादा संख्या, विषयांचे विभाजन, अभ्यासक्रमात आलेले नवीन विषय आणि बदल यांसारख्या अनेक आव्हानांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हा स्थिर दस्तऐवज नसून सतत बदलत राहणारा आणि काळानुसार नव्या आव्हानांना सामोरे जाणारा एक गतिशील आराखडा आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही एका दिवसाची किंवा एका वर्षाची प्रक्रिया नसून एक अविरत प्रवास आहे. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी अशा कार्यशाळा आणि परिषदा आयोजित करणे गरजेचे असल्याचे संघटनेचे मत आहे.
नवीन शिक्षण धोरण सरकारी धोरणाचा भाग असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना शिक्षक, विद्यार्थी आणि महाविद्यालयांना अनेक मर्यादांचा सामना करावा लागला आहे. हे लक्षात घेऊन MUST संघटनेने ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या समस्या, शैक्षणिक संरचनेतील बदल, तसेच भविष्यातील शिक्षणाच्या दिशा यावर चर्चा होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार आणि सरचिटणीस डॉ. निर्मला पवार यांनी महाविद्यालयांतील जास्तीत जास्त प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची उपस्थिती. ते ‘विद्यार्थी, शिक्षक आणि समाजासाठी NEP 2020 चे परिणाम आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबतच मुंबई उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रूपेश राऊत आणि कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बॉदर देखील उपस्थित राहणार आहेत.
ही कार्यशाळा ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, नॅनो सायन्स सेंटर, कलिना कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली असून, शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम पार पडणार आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील बदल समजून घेण्यासाठी आणि NEP चा शैक्षणिक क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची संधी ठरणार आहे.