फोटो सौजन्य - Social Media
दिवाळीची सुट्टी संपताच राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांनी सहलींची तयारी सुरू केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक होते. विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावर्षी विशेष निर्णय घेत शालेय सहलींसाठी नव्या आणि आधुनिक एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या. हा निर्णय अत्यंत यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली.
फक्त नोव्हेंबर महिन्यातच राज्यातील विविध आगारांमधून तब्बल २,२४३ एसटी बसेस शालेय सहलींसाठी आरक्षित करण्यात आल्या. या एका महिन्यात जवळपास १ लाख विद्यार्थी नव्या कोऱ्या एसटीने विविध ठिकाणांच्या भेटीवर गेले. शासनाने विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सवलत दिल्यामुळे सहल खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि शाळांना कमी बजेटमध्ये उत्तम सहली घेता आल्या. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ले, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे आणि पर्यावरण पर्यटन स्थळांना भेट देत आनंद लुटला.
या वाढत्या मागणीचा थेट लाभ एसटी महामंडळालाही झाला. नोव्हेंबरमध्ये शालेय सहलींसाठी दिलेल्या बसांमधून महामंडळाला तब्बल १० कोटी ८५ लाख रुपये महसूल मिळाला. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये आरक्षित बससंख्या आणि महसूल, या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विभागनिहाय उत्कृष्ट कामगिरी: कोल्हापूर आघाडीवर
राज्यातील ३१ विभागांची आकडेवारी पाहिल्यास कोल्हापूर विभाग सर्वांत पुढे दिसतो. कोल्हापूर विभागाने ३७५ बसेस उपलब्ध करून देत पहिला क्रमांक पटकावला असून त्यातून १ कोटी ७७ लाखांचा महसूल नोंदवला.
दुसऱ्या क्रमांकावर सांगली विभाग असून त्यांनी २११ बसेस शालेय सहलींसाठी दिल्या.
तर रत्नागिरी विभागाने २०१ बसेस उपलब्ध करून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. कोकणातील निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याने या विभागाची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.
डिसेंबर–जानेवारीसाठीही मोठी तयारी
डिसेंबर आणि जानेवारी हे परंपरेने शाळा-महाविद्यालयीन सहलींचे महिने मानले जातात. हा हंगाम लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पुढील दोन महिन्यांसाठीही अधिकाधिक नव्या बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांचा सुरक्षिततेचा विचार करून आधुनिक सुविधा, GPS, ट्रॅकिंग प्रणाली आणि उत्कृष्ट मेंटेनन्स असलेल्या बसेस शाळांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शाळांनी सहलींसाठी एसटीचा पर्याय निवडावा, असे आवाहनही केले. स्वस्त दर, प्रशिक्षित चालक, सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्ह सेवा यामुळे एसटी बसेस शालेय सहलींचा पहिला पर्याय बनत आहेत. विद्यार्थ्यांना आनंददायी आठवणी देणाऱ्या या सहली सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी एसटी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.






