फोटो सौैजन्य - Social Media
मध्य प्रदेशातील बुरहानपूर या लहानशा शहरातून येणाऱ्या मुर्तजा अमीन यांनी अतिशय प्रेरणादायी उद्योजकतेचा प्रवास घडवला आहे. सामान्य कुटुंबातून आलेले मुर्तजा यांचे वडील इलेक्ट्रिशियन होते. मात्र, या पार्श्वभूमीवरूनही त्यांनी मोठी झेप घेतली. आज ते “बिजप्रॉस्पेक्ट्स” या डेटा विक्री करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. सध्या या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 8 कोटी रुपयांहून अधिक असून, त्यामध्ये 100 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कंपनीची कार्यालये बुरहानपूर आणि नागपूरमध्ये आहेत.
मुर्तजांचा प्रवास सहजसोपा नव्हता. त्यांनी केवळ 3 लाख रुपयांच्या कर्जावरून व्यवसाय सुरू केला. 19 व्या वर्षी त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेज मधून शिक्षण अर्धवट सोडले आणि मुंबई गाठली. तिथे त्यांनी “प्राईसबाबा” या स्टार्टअपमध्ये इंटर्नशिप करत डेटा कसा संकलित करावा, त्याचे विश्लेषण कसे करावे आणि त्याचा व्यावसायिक वापर कसा करता येतो हे शिकून घेतले. याच काळात त्यांना डेटाच्या क्षेत्रातील अफाट संधीची जाणीव झाली आणि त्यांनी 2013 साली बुरहानपूरला परत येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
मुर्तजांच्या पहिल्या ग्राहकाने त्यांच्या कामावर विश्वास ठेवत 3 लाख रुपयांचे कर्ज दिले. त्या पैशातून त्यांनी कंपनीची सुरुवात केली. त्यांनी स्थानिक युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या दिल्या. विशेषतः त्यांनी महिलांना संधी देताना सुरक्षित आणि लवचिक वर्कप्लेस तयार केला, जिथे त्या घरी राहूनही काम करू शकतात. यामुळे कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा वाटा लक्षणीय आहे.
कोरोना महामारीदरम्यान डेटा सेवा क्षेत्रात प्रचंड मागणी वाढली, याचा फायदा मुर्तजांच्या कंपनीला झाला. 2020 मध्ये त्यांनी 5 कोटी रुपयांचा टर्नओव्हर गाठला आणि आता तो 8 कोटींच्या पुढे गेला आहे. त्यांचे 98% ग्राहक हे परदेशातील असून, अमेरिका, युरोप, जपान आणि मिडल ईस्टमधील कंपन्या त्यांच्याशी जोडल्या आहेत.
मुर्तजांनी दाखवून दिलं की यश मिळवण्यासाठी मोठ्या शहरात असणे गरजेचे नाही. चिकाटी, मेहनत आणि दूरदृष्टी असली की गावात बसूनही जागतिक व्यवसाय उभारता येतो. त्यांची कथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.