फोटो सौैजन्य - Social Media
राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून २०२५ पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात “शाळा प्रवेशोत्सव” या कार्यक्रमाद्वारे उत्साहात होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल. हा दिवस औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना आनंद, आत्मीयता आणि प्रेरणा देणारा ठरावा, हा मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही.
राज्यात सध्या एकूण ४९७ शासकीय आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. नाशिक व ठाणे विभागातील शाळा १६ जूनपासून सुरू होतील, तर नागपूर व अमरावती विभागातील शाळा ३० जूनपासून सुरू होतील. मंत्री डॉ. वुईके स्वतः मुंडेगाव येथील शाळा प्रवेशोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक परिचारिका नियुक्त केली जाणार आहे. ६ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असून त्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळेल. तपासणी, प्रथमोपचार आणि वैद्यकीय सल्ला देण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’ या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षक भरती अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित होईल. सर्व निवडलेले शिक्षक TET उत्तीर्ण असणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल. गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक दिले जाईल. यामुळे गुणवत्तेचा सन्मान होईल आणि प्रेरणा मिळेल.
वसतीगृहातील सुविधा, आरोग्य आणि प्रशासकीय सुसंवाद वाढवण्यासाठी ‘वसतिगृह समन्वय समिती’ गठीत करण्यात आली आहे. ही समिती समस्यांचे तातडीने निराकरण करेल. ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमाद्वारे वरिष्ठ अधिकारी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शासनाविषयी विश्वास निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो आहे.